भंडाऱ्यात धारदार शस्त्रांनी 2 तरुणांची निर्घृण हत्या
भंडारा: भंडारा जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास धारदार शस्त्रांनी दोन तरुणांची हत्या करण्यात आली. मृतांची ओळख वसीम उर्फ टिंकू खान (35) आणि शशांक गजभिये (23) अशी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, टिंकू खान आणि शशांक दुकानात काम करत होते. यावेळी अचानक तीन-चार हल्लेखोर घटनास्थळी येऊन धारदार शस्त्रांनी दोघांवर हल्ला केला. या आघातामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, टिंकू खान आणि हल्लेखोरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद होता. हा वाद कशावरून सुरू झाला होता, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या वादामुळेच ही हिंसक घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन परिसर सील केला असून, मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचा - Mumbai Crime : भयंकर! क्रीडा मैदानातील प्रसाधनगृहात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत
गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिस सध्या सर्व शक्य तो तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि साक्षीदारांच्या जबाबांची मदत घेऊन तपास करण्यात येत आहे. भंडारा पोलिस प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्परतेने कारवाई करत असल्याचे सांगितले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या हिंसाचार टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सुरक्षा वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.