गेवराईतील कथित गोळीबारात महिला जखमी; अधिकृत नोंद न

Beed Crime: बीडच्या गेवराईत महिलेवर गोळीबार, दवाखान्यात उपचार सुरु तरीही पोलीस अनभिज्ञच

Beed Crime: बीड जिल्ह्यातल्या गेवराई परिसरात घडलेल्या कथित गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी महिला शीतल कटमिल्ला पवार भोसले (वय 26) सध्या छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र या गोळीबाराची अधिकृत नोंद गेवराई पोलिसांकडे नसल्यामुळे प्रकरणाभोवती गूढाचे सावट निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार-रविवारच्या मध्यरात्री शीतल पवार हिला तिची नातेवाईक रुचिका भोसले यांनी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक चौकशीत रुचिकाने 'शहागड येथून खरेदीसाठी गेवराईत आल्यानंतर गोळीबार झाला' असा दावा केला. वैद्यकीय तपासणीत शीतलच्या उजव्या छातीत गोळी असल्याचे एक्स-रेमध्ये स्पष्ट झाले. त्यानंतर तिला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले.परंतु, गेवराई पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी सांगितले की, 'गावात किंवा परिसरात अशा घटनेची कोणतीही माहिती अथवा नोंद आमच्याकडे नाही.' इतकंच नव्हे तर उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथेही या घटनेची कोणतीही नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. हेही वाचा: इथे माणूसकीनेही जीव सोडला ! हताश पतीने पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधला आणि...Video viral जखमी महिला शीतल आणि तिचा पती संदीप हे खामगाव येथील असून, शीतल सध्या शहागड येथे राहते. पोलिसांनी घटनाक्रम समजून घेण्यासाठी शीतलचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता, तिने 'माझ्या पती आणि सवतीमध्ये घरगुती वाद सुरु असताना सवतीच्या भावाने व बहिणीने मारहाण केली. मात्र गोळी कोणी झाडली हे मला सांगता येत नाही,' असे सांगितले. तसेच, 'दवाखान्यातून सुटी मिळाल्यानंतरच मी संपूर्ण जबाब देईन,' असेही ती म्हणाली. हेही वाचा: नवऱ्याला मारण्यासाठी पत्नीने You Tube वरून घेतले धडे! प्रियकराच्या मदतीने पतीच्या कानात कीटकनाशक टाकून केली हत्या दरम्यान, जखमीला घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी तेथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले की, 'गोंधळाच्या पार्श्वभूमीवर जखमी महिलेच्या सुरक्षेसाठी पाच पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.'

या घटनेचा नेमका सत्य घटनाक्रम, गोळीबार कुठे झाला आणि त्यामागचे कारण काय, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, शीतल पवार भोसलेचा सविस्तर जबाब मिळाल्यानंतरच प्रकरणाची खरी पार्श्वभूमी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.