Chhatisgarh Crime News : छत्तीसगड हादरलं! बदला घेण्यासाठी शिक्षकाने मिसळलं 426 विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल
छत्तीसगड: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. रागाच्या भरात आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी, पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आणि त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षांपासून आरोपी शिक्षक धनंजय साहू आणि वसतिगृह अधीक्षक दुजल पटेल यांच्यात वाद सुरू होता. यापूर्वी, धनंजय साहू अधीक्षक पदावर काम करत होते. मात्र, त्यावेळी साहू यांनी एका विद्यार्थ्याला मारहाण केली होती. त्यामुळे, धनंजय साहू यांना अधीक्षक पदावरून काढून टाकण्यात आले आणि दुजल पटेल यांची वसतिगृह अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामुळे, रागाच्या भरात धनंजय साहू यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याचे आढळून आले.
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या शिक्षकाला...
या प्रकरणी, छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याचे एसपी रोहित शाह म्हणाले की, 'विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या शिक्षकाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तसेच, धनंजय साहू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे'.