कोल्हापूरमध्ये अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश;तीन महिलांना अटक
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान व गर्भपाताच्या गोळ्या विक्रीचे रॅकेट सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या संदर्भात तातडीने कारवाईचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने करवीर पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. बुधवारी सायंकाळी कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये ही कारवाई करण्यात आली. तपासात या ठिकाणी गर्भलिंग निदानासाठी सोनोग्राफी मशीनचा गैरवापर होत असल्याचे तसेच गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांची विक्री होत असल्याचे समोर आले.
कारवाईदरम्यान रॅकेटमधील एका एजंटला या ठिकाणी येताना पाहण्यात आले. मात्र, त्याला कारवाईची कल्पना लागताच त्याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी गर्भपाताच्या गोळ्यांची अनेक पाकिटे जप्त केली आहेत. याप्रकरणी आरोग्य विभागाने डॉक्टर दिपाली ताईगडे यांच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तसेच, वरणगे पाडळी येथेही छापेमारी करून सत्यप्रिया उर्फ सुप्रिया माने आणि धनश्री मुधाळे या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघी गर्भपाताच्या गोळ्या विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख देसाई, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील देशमुख आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने यांनी संयुक्तपणे केली.
पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी डॉक्टर दिपाली ताईगडे, सत्यप्रिया उर्फ सुप्रिया माने आणि धनश्री मुधाळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून, या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.