सावकाराच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून कर्जाच्या ब

सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाची आत्महत्या; सुसाईड नोटही सापडली

मुंबई: कल्याण पश्चिममधील मोहने परिसरातून एक धक्कादायक आणि मनाला हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सावकाराच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या विजय मोरे या रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दरम्यान, त्यांच्या खिशातून सुसाईड नोटदेखील सापडली असून यामध्ये त्यांनी सावकाराकडून होणाऱ्या मानसिक त्रासाची माहिती दिली आहे. या प्रकरणी, खडकपाडा पोलीस ठाण्यात सावकार सचिन दळवी आणि त्यासोबत एक अज्ञात महिलेविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आर्थिक अडचणींमुळे सावकाराकडून घेतलेले कर्ज:

विजय मोरे आपल्या पत्नी आणि दोन्ही मुलांसोबत कल्याण पश्चिममधील मोहने परिसरात राहत होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी विजय मोरे रिक्षा चालवत होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे विजय मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी सावकार सचिन दळवीकडून कर्ज घेतले होते. त्यानंतर कर्ज वसूल करण्यासाठी सावकार सचिन दळवी आणि त्यांच्यासोबत एक महिला विजय मोरे यांच्या घरी येऊन त्यांना सतत शिवीगाळ करत होते आणि दमदाटी करत त्रास देऊ लागले. हा प्रकार वारंवार होऊ लागल्यामुळे ते प्रचंड मानसिक ताण-तणावात होते.

त्यानंतर, ३१ मार्च रोजी विजय मोरे यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच, त्यांच्या कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान, डॉक्टरांनी विजय मोरे यांना मृत घोषित केले. यादरम्यान, त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली होती. सावकाराकडून माझा खूप छळ होत आहे. त्यामुळे सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी नमूद केले होते.

याप्रकरणी, पोलिसांनी सावकार सचिन दळवी आणि त्या अज्ञात महिलेविरुद्ध विजय मोरे यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्यामुळे कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिस या प्रकरणावर अधिक तपास करत आहेत.