गौतम गंभीरला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी ; मी तुला मारेन ई-मेलमध्ये एवढे तीनच शब्द
नवी दिल्ली: भारताचे माजी क्रिकेटपटू, सध्याचे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि भाजपचे माजी खासदार गौतम गंभीर यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही धमकी 'ISIS काश्मीर' या नावाने आलेल्या ईमेलमधून देण्यात आली असून, यामुळे गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
22 एप्रिल रोजी गौतम गंभीर यांना दोन ईमेल प्राप्त झाले. एक दुपारी आणि दुसरा संध्याकाळी. या दोन्ही ईमेलमध्ये "IKillU" असे फक्त एकच वाक्य होते. विशेष बाब म्हणजे, ईमेलच्या विषयावर "ISIS" असा उल्लेख करण्यात आला होता. या धमकीमुळे गंभीरने तातडीने दिल्लीतल्या राजेंद्र नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गौतम गंभीर यांनी पोलिसांकडे औपचारिक एफआयआर दाखल करण्याची विनंती केली असून, आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. सध्या दिल्ली पोलिसांचा सायबर सेल या ईमेलचा तपास करत असून, मूळ आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरी, प्राथमिक चौकशीला सुरुवात झाली आहे.
ही पहिली वेळ नाही आहे की गौतम गंभीर यांना अशा स्वरूपाची धमकी मिळाली आहे. 2021 मध्ये, जेव्हा ते खासदार होते, तेव्हाही त्यांना अशाच प्रकारचा ईमेल आला होता. त्यामुळे गौतम गंभीर यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.