शिक्षक सहकारी बँकेला 73 लाखांचा गंडा, बनावट दागिन्

नागपुरात बँक अधिकाऱ्यांना अंधारात ठेवत बनावट दागिने ठेवून गोल्ड लोनमध्ये 73 लाखांचा घोटाळा

नागपूर : बनावट दागिने ठेवून 73 लाखांचे गोल्ड लोन घेऊन शिक्षक सहकारी बँकेला गंडा घालणाऱ्या 17 आरोपींवर पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिल उरकुडे, जो ज्वेलर्सचा मालक आहे, याच्यासह 16 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अनिल हा शिक्षक सहकारी बँकेच्या कमाल चौक शाखेत गहाण ठेवण्यासाठी येणाऱ्या सोन्याचे दागिने तपासण्याचे आणि त्याची खात्री देण्याचे काम करत होता.

मात्र, अनिल उरकुडे याने 16 ग्राहकांसोबत संगणमत करून त्यांचे बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे बँकेला सांगितले. बँकेने या 16 ग्राहकांना एकूण 73 लाख 90 हजार 944 रुपयांचे गोल्ड लोन दिले. अनेक वर्ष उलटूनही या ग्राहकांनी गहाण ठेवलेले दागिने परत न नेल्यामुळे बँकेला संशय आला. त्यामुळे बँकेने या दागिन्यांची पुन्हा तपासणी केली असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी शिक्षक सहकारी बँकेचे व्यवस्थापक लक्ष्मण विठ्ठलराव सिंगम यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीनंतर अनिल उरकुडे आणि इतर 16 आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून बँकेला 73 लाख 90 हजार 944 रुपयांचा फटका बसला आहे.

या प्रकरणामुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी संगणमत करून बँकेला मोठ्या रकमेचा गंडा घातल्याने बँकिंग प्रणालीवरील विश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.