HIV पॉझिटिव्ह व्यक्तीकडून 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण; तब्बल 10 महिने डांबून ठेवण्यात आईचीही साथ
अहमदाबाद : HIV पॉझिटिव्ह व्यक्तीने 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला तब्बल 10 महिने डांबून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही 17 वर्षीय मुलगी एका लग्नाला गेली असता, तिथून अचानक गायब झाली. तिचा आणि तिला पळवून नेणाऱ्या व्यक्तीचा 10 महिने कसून शोध घेण्यात आला. मात्र, सुरुवातीला या शोधाला पूर्ण अपयश आलं. अखेर या HIV पॉझिटिव्ह व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
ही HIV पॉझिटिव्ह व्यक्ती अत्यंत कावेबाजपणे वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलत फिरत राहिली. गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेश अशा चार राज्यांमध्ये आरोपी पीडित मुलीला घेऊन फिरत राहिला. या अल्पवयीन मुलीला एका लग्नातून पळवून आणल्यानंतर अत्यंत कडक बंदोबस्तात डांबून ठेवले होते. तिला पुरेसे खायलाही दिले जात नसे. या मुलीचा शोध घेता घेता तब्बल 10 महिन्यांनी 3 फेब्रुवारी रोजी पोलिसांना एका एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीचा शोध लागला. पण इतके दिवस हा आरोपी पोलिसांपासून कसा लपत राहिला आणि तो सापडला का नाही? याबद्दल तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मध्य प्रदेशातील एका बंद खोलीतून या मुलीची सुटका करण्यात आली. शहर गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने (एएचटीयू) ही कारवाई केली. आरोपीने या खोलीत पीडित मुलीला बंद करून ठेवले होते. ही अल्पवयीन मुलगी 22 मार्च 2024 रोजी तिच्या पालकांबरोबर अहमदाबाद येथील शाहीबाग येथे एका लग्न समारंभाला गेली होती. त्या दिवशी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ती बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या वडीलांनी शाहीबाग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त, विभाग ‘एफ’ यांच्या नेतृत्वाखाली तीन महिने तपास केल्यानंतरही मुलीचा ठावठिकाणा सापडला नाही. त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण एएचटीयूकडे वर्ग करण्यात आले होते. तसेच, पीडितेच्या वडिलांनी गुजरात उच्च न्यायालयात तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी करत हेबियस कॉर्पस याचिका (habeas corpus petition) दाखल केली, अशी माहिती गुन्हे शाखेच्या निवेदनात देण्यात आली आहे.
इतके दिवस असा लपून राहिला अनेक राज्यांमध्ये केलेल्या तपासानंतर एएचटीयू पोलिसांना मध्य प्रदेशमधील बिजोरीच्या कोटमा येथे पीडितेचा शोध लागला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने सुरुवातीला पीडितेला बरेजा येथील भाड्याच्या खोलीत ठेवले होते. इतकेच नाही तर, आरोपीच्या आई आणि भावाने कथितरीत्या त्याला पीडितेला लपवून ठेवण्यात मदत केली. या आरोपीने मुलीवर कडक बंधने घालून तिला डांबून ठेवले होते. तिच्या जेवणावर देखील बंधनं घालण्यात आली होती, असे तपासात उघड झाले आहे.
हेही वाचा - जंगलात शिकारीला गेले अन् सहकाऱ्याचीच केली शिकार, रानडुक्कर समजून झाडली गोळी
लपून राहण्यासाठी वकीलाकडूनही घेतला सल्ला आरोपीने लपून राहण्यासाठी चक्क एका वकीलाकडून सल्ला घेतला होता. यानंतर आरोपी पीडितेला घेऊन वेगवेगळ्या शहरात फिरत राहिला. यादरम्यान तो सुरत, औरंगाबाद, बीड, हैदराबाद, नागपूर, बिलासपूर येथे गेल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, आता आरोपीला सल्ला देणाऱ्या वकिलावर देखील कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा - Ayodhya Crime : अयोध्येत बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला छिन्नविछिन्न अवस्थेत; योगी सरकारवर जोरदार टीका
यापूर्वीही आणखी सहा मुलींचे शोषण जवळपास दहा महिन्यानंतर पीडित मुलगी अखेर कोटमा येथे आढळून आली, जेथे आरोपीने त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने घर भाड्याने घेतले होते. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने यापूर्वीही सहा मुलीचे लैगिंक शोषण केले आहे. दरम्यान त्यांना एचआयव्हीची लागण झाली आहे की, नाही हे तपासण्यासाठी सातही पीडितांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. सध्या आरोपीला शाहीबाग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, येथे मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.