Malad Crime: '...तर माझ्या भावाचा जीव वाचला असता', रेस्टॉरंटमधील जेवणावरून कल्पेश भानुशालीनं गमावला जीव; एकाला अटक, चार फरार
मुंबई: मुंबईतील मालाड पश्चिम येथील चिंचोली बंदर येथील गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंटजवळ पहाटे 3 वाजता पाच जणांनी मिळून एका व्यक्तीची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव कल्पेश भानुशाली आहे.
गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंटमधील जेवणावरून संजय मकवाना यांचे मृत कल्पेश भानुशाली यांच्याशी भांडण झाले. त्यामुळे संजय मकवाना यांनी त्यांच्या चार मित्रांना बोलावून लाथा आणि शस्त्रांनी कल्पेश भानुशालीवर हल्ला केला.
एक आरोपी अटकेत तर चार फरार दरम्यान, त्यांच्या डोक्यात अनेक बिअरच्या बाटल्या फोडल्या आणि त्यांना गंभीर जखमी केले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी कल्पेश भानुशाली यांना मृत घोषित केले. या हत्याकांडातील एका आरोपीला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. तर चार फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
'...तर माझ्या भावाचा जीव वाचला असता' मृताचा भाऊ परेश भानुशाली म्हणाले की, जर गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंट इतक्या उशिरापर्यंत उघडले नसते तर माझ्या भावाचा जीव वाचला असता. जेवणाच्या कारणावरून हा वाद झाला आणि संजय मकवाना यांनी त्याच्या मित्रांसह माझ्या भावाला लाथा मारून बिअरच्या बाटलीने आणि धारदार शस्त्राने हल्ला करून ठार मारले. मालाड पोलिसांनी आतापर्यंत एका आरोपीला अटक केली आहे आणि चार आरोपी फरार आहेत.
बुधवारी रात्री 1:30 च्या सुमारास गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंटजवळ हाणामारी झाली. ज्यामध्ये पाच जणांनी मिळून एका व्यक्तीची हत्या केली. ज्यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि चार आरोपी फरार आहेत. मालाड पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती डीसीपी संदीप जाधव यांनी दिली.