अज्ञातांच्या गोळीबारात अबू सैफुल्ला ठार; पाकिस्तानातील सिंध माटली फालकारा चौकातील घटना
नवी दिल्ली: 2006 मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्याचा कट रचणारा धोकादायक दहशतवादी अबू सैफुल्लाह पाकिस्तानात ठार झाला आहे. अबू सैफुल्लाहची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सैफुल्लाह याला पाकिस्तानकडून संरक्षण दिले जात होते. मात्र, ते संरक्षण तोडून अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली. हल्लेखोरांनी सैफुल्लाह याच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडल्या होत्या. या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला. जेव्हा सैफुल्लाह त्याच्या घरातून बाहेर पडला होता, त्याच क्षणी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यादरम्यान, अबू सैफुल्लाहच्या हत्येमुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे मनोधैर्य चांगलेच हादरले आहे.
सैफुल्लाहची हत्या झाली तरी कशी?
अबू सैफुल्लाहची पाकिस्तानमधील त्याच्या घराबाहेर हत्या करण्यात आली होती. सैफुल्लाह पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील माटली शहरात राहत होता. जेव्हा तो घराबाहेर पडला, तेव्हा काही अज्ञात हल्लेखोरांनी माटली फलकारा चौकात सैफुल्लाहवर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये सैफुल्लाहचा मृत्यू झाला.
हेही वाचा: कैलास मानसरोवर यात्रा लवकरच सुरू होणार; कामगार प्रभारी सुनील कुमारांनी दिली माहिती
भारतामधील 3 दहशतवादी हल्ल्यामध्ये सैफुल्लाहचा सहभाग:
अबू सैफुल्लाह हा 'लष्कर ए तैयबा' नावाच्या या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर होता. इतकंच नाही, तर त्याने नागपूरसोबतच बंगळुरूमध्ये देखील बॉम्ब हल्ल्यांची योजना आखली होती. त्याने काश्मीरमध्येही दहशतवादी कारवाया केल्या होत्या. 2001 मध्ये रामपूर येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये अबू सैफुल्लाह मुख्य आरोपी होता. 2005 मध्ये झालेल्या आयआयएससी बेंगळुरूवरील हल्ल्याचा देखील अबू सैफुल्लाह मास्टरमाईंड होता.
अबू सैफुल्ला, ज्याचे पूर्ण नाव मोहम्मद सलीम उर्फ राजुल्ला निजामानी होते, तो सध्या नेपाळमधील लष्कर-ए-तैयबाचं पूर्ण मॉड्यूल चालवत होता. तो लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत करायचा. त्याने नेपाळमध्ये दहशतवाद्यांचे एक मोठे नेटवर्क तयार केले होते. तेथून तो त्याच्या नापाक कारवाया करत असे.