Chhtrapati Sambhajinagar Crime : पोलिसांनीच काढली आरोपीची धिंड ; मद्यपानासाठी पैसे न दिल्याने केला होता हल्ला, जाणून घ्या नेमकं काय झालं?
विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक महिती समोर आली आहे. मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने आरोपी हर्षल गणेश मुळे (वय: 36, रा. एन-9) याने भर रस्त्यात दोन जणांच्या पोटात चाकूने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी, सिडको पोलिसांनी आरोपी हर्षलला अटक करत बुधवारी रात्री टीव्ही सेंटर परिसरासह जेथे हल्ला केला, त्या परिसरातून हातकंड्यासह धिंड काढली. या हल्यात पीडित विनोद पोटदुखे आणि गजानन गाडेकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
17 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता विनोद पोटदुखे आणि गजानन गाडेकर हे दोघे एन-9 मधील चहाच्या हॉटेलजवळ उभे होते. तेव्हा, हर्षलने विनोद आणि गजानन यांच्याकडे मद्यपान करण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने हर्षलने अरेरावी करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर धक्काबुक्की करत हर्षलने त्यांची चप्पल हिसकावली आणि रागाच्या भरात हर्षलने छातीत चाकूने वार केला. या घटनेनंतर, जेव्हा पीडित विनोद रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळला, तेव्हा विनोदला मदत करण्यासाठी त्याचा मित्र गजानन धावून आला. मात्र, तेव्हा हर्षलने गजाननवरही चाकूने हल्ला केला. त्यामुळे, विनोद आणि गजानन दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिकांनी विनोद आणि गजानन यांना रुग्णालयात दाखल केले.