मंगळवेढ्यात दीर-भावजयीच्या अनैतिक संबंधांची थरारक कथा
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ गावात घडलेली ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दीर आणि भावजयीच्या अनैतिक संबंधांचा शेवट थरारक कटात झाला आहे. किरण सावंत (वय 23) ही विवाहित महिला आपल्या दीर निशांत सावंत (वय 20) याच्याशी अनैतिक संबंधात असल्याचे समोर आले आहे.
किरणचा नवरा नागेश सावंत याला या प्रकरणाची कुठलीही कल्पना नव्हती. मात्र, किरण आणि निशांत यांनी एकत्र येऊन आपल्या नव्या आयुष्याची स्वप्नं पाहिली आणि त्यासाठी त्यांनी असा कट रचला, की संपूर्ण गाव हादरलं. त्यांनी बनावट आत्महत्येचा डाव आखत एका निरपराध महिलेला निर्दयपणे जाळून मारले.
निशांत सावंत याने पंढरपूरमध्ये रस्त्यावर भटकत असलेल्या एका वेडसर महिलेला शोधून आणलं. ही महिला आपल्या मुलाच्या शोधात वेडी झाली होती. निशांत आणि किरणने मिळून या महिलेला ठार मारलं आणि तिचा मृतदेह नागेश सावंत यांच्या घराजवळ असलेल्या गवताच्या गंजीत ठेवला. त्यानंतर रात्रीच्या वेळी निशांतने या गंजीला आग लावली. त्या क्षणी किरण घरातून पळून डाळिंबाच्या बागेत लपली होती. हेही वाचा: महादेव मुंडे हत्या प्रकरण: पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातच घेतलं विष
गंजी पेटल्यावर गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निशांत देखील मदतीसाठी पुढे आला. आग विझवताना ग्रामस्थांच्या लक्षात आले, की गंजीमध्ये एका महिलेला जळालेल्या अवस्थेत ठेवले आहे. मृतदेहाजवळ किरणचा मोबाईल सापडल्याने सगळ्यांना वाटलं, किरणने आत्महत्या केली असावी. या घटनेनंतर किरणचा पती नागेश सावंत यांनी म्हटलं, 'किरणने अशा प्रकारचं पाऊल उचलावं याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आमच्या कुटुंबावर संकट कोसळलं असून, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.' मात्र, खरी कथा पुढे येण्यास फार वेळ लागला नाही.
पोलिसांनी तपास सुरू केला आणि मृतदेहाजवळ मिळालेल्या मोबाईलच्या सीडीआर रेकॉर्डवरून निशांतचा नंबर मिळाला. पोलिसांनी निशांतला ताब्यात घेतले. सुरुवातीला निशांतने काहीही कबुली दिली नाही, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व कबुल केले. हेही वाचा:उद्योजक आणि शेतकऱ्याला तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 50 लाखांचा गंडा
या घटनेचा शेवट अजून धक्कादायक ठरला, जेव्हा पोलिसांनी निशांतच्या मोबाईलवरून किरणला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलवर किरण दिसताच पोलिसांना खात्री पटली की ती जिवंत आहे. त्यानंतर पोलिसांनी कराड येथे जाऊन तिला ताब्यात घेतले.
या थरारक प्रकरणाने संपूर्ण मंगळवेढा परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधाच्या आंधळ्या मोहापोटी एका निरपराध महिलेचा जीव घेतल्याची ही अमानवी घटना समाजमन हादरवणारी ठरली आहे.