तिसगावात जुन्या भांडणाच्या कारणावरून आणि रागाने बघ

संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यात 5 पेक्षा अधिक तरूण जखमी

छ. संभाजीनगर: तिसगावात जुन्या भांडणाच्या कारणावरून आणि रागाने बघितल्याच्या वादातून योगेश कासुरे (वय: 33) या तरुणाला तलवारीने हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री 9:30 वाजता घडली. याप्रकरणी, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मृत योगेश कासुरे यांचा चुलत भाऊ राजेश कासुरे यांच्या घरासमोरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक 300 ते 400 मीटर पुढे गेल्यावर, जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी बिरजू तरैय्यावाले हा योगेश कासुरे यांकडे रागाने पाहू लागला. त्यामुळे या दोघांमध्ये वाद सुरू झाला. काही वेळानंतर, आरोपी बिरजू तरैय्यावाले, आकाश मन्नुलाल तरैय्यावाले, ओमकार मोहनसिंग सलामपुरे, कुंदन मन्नुलाल तरैय्यावाले, चंदुलाल मिड्डूलाल तरैय्यावाले आणि इतर 5 ते 6 जण हातात तलवार, चाकू, लोखंडी रॉड असे धारदार शस्त्र घेऊन योगेश कासुरे यांच्या दिशेने धावत आले.

त्यावेळी, आरोपी आकाश मन्नुलाल तरैय्यावाले आणि बिरजू मिठ्ठलाल तरैय्यावाले यांनी धारदार तलवारीने योगेशची हत्या करण्याच्या उद्देशाने त्याच्या छातीवर आणि पाठीवर सपासप वार केले. त्यानंतर, आरोपी बिरजू मिठ्ठलाल तरैय्यावाले यांनी लोखंडी रॉडने योगेशच्या डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना घडल्यानंतर, योगेशला वाचवण्यासाठी त्याचा चुलत भाऊ राजेंद्र कासुरे आणि नरेंद्र शामलाल कासुरे मदतीसाठी आल्यावर आरोपींनी त्यांच्यावरही धारदार तलवारीने आणि लोखंडी रॉडने वार करून जखमी केले.

घटनेनंतर, बाजूला असलेले राहुल कासुरे, सागर कासुरे, कमलेश सलामपुरे, ऋषीकेश सलामपुरे, गोपाल सलामपुरे आणि सोमनाथ क्षत्रिय यांनी मिळून भांडण थांबवले. त्यानंतर पीडित योगेश कासुरे, राजेंद्र कासुरे आणि नरेंद्र शामलाल कासुरे यांना खाजगी दवाखान्यात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत.

घटनास्थळी उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली भेट

घटनेचे गांभीर्य लक्षात येताच छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे तिसगाव येथे येऊन नागरिकांना समजूत काढली आणि शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.