रक्षा खडसे यांची पोलिसांना मागणी – दोषींवर तत्काळ

मुक्ताईनगर यात्रेत छेडखानी प्रकरण! केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आक्रमक

मुक्ताईनगर : तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही तरुणींची टवाळखोर तरुणांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे तत्काळ कारवाईची मागणी केली असून, दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचा आग्रह धरला आहे.

याप्रकरणी रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात चार तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी संबंधित तरुणांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे रक्षा खडसे संतप्त झाल्या असून, त्यांनी थेट मुक्ताईनगर पोलिस ठाणे गाठून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

संत मुक्ताई यात्रेत मोठ्या संख्येने भक्तगण व नागरिक सहभागी होतात. यात्रेच्या निमित्ताने महिलांवर अशा प्रकारच्या अनुचित घटना घडणे हे अत्यंत चिंताजनक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. या प्रकारानंतर मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिस प्रशासनाला चांगलेच सुनावले. "मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली पाहिजेत. छेडछाड करणाऱ्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे," अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

मुक्ताईनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. संबंधित टवाळखोरांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे. मात्र, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.