इथे माणूसकीनेही जीव सोडला ! हताश पतीने पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधला आणि...Video viral
तेजस मोहातुरे. प्रतिनिधी. नागपूर: नागपुरात एक हद्यद्रावक घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वत:च्या पत्नीचा मृतदेह दुचाकी गाडीला बांधून नेताना दिसत आहे. दुर्दैव म्हणजे, मदतीसाठी विनवणी करूनही कोणीही त्याच्या मदतीला न आल्याने पतीने आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवरून घेऊन जाण्याचा निश्चय केला. या घटनेमुळे, नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
रक्षाबंधन असल्याने अमित यादव त्याच्या पत्नी ग्यारसी यादवसह दुचाकीने देवलापारमार्गे करणपूरला जात होता. या दरम्यान, दुपारी 3:30 वाजल्याच्या सुमारास मागून एक ट्रक वेगाने येत होती. तेव्हा ट्रकचा धक्का लागल्याने पत्नी दुचाकीवरून खाली पडली आणि ट्रकच्या चाखाखाली आली. या घटनेमुळे, पत्नी ग्यारसी यादवचा जागीच अंत झाला. या दरम्यान, अमित यादवने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडून हात जोडून मदत मागितली. दुर्दैवाने, त्याच्या मदतीसाठी कोणीही थांबले नाही.
अखेर, कोणाकडूनही मदत न मिळाल्याने हताश अमित यादवने, स्वत:च्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर नेण्याचा निश्चय केला. संतापजनक बाब म्हणजे, जेव्हा संतप्त अमित यादव त्याच्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवरून घेऊन जाताना दिसला, तेव्हा अनेकांनी त्याला थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र, भीतीमुळे पती अमित यादव थांबायला तयार नव्हता. जेव्हा, या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाली, तेव्हा त्यांनी अमित यादवला रोखले आणि पत्नी ग्यारसी यादवचा मृतदेह ताब्यात घेतला आणि उपचारासाठी नागपुरच्या मेयो रूग्णालात पाठवला. सध्या, पोलिस या घटनेचा तपास करत आहे.