वाशिम जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळ

Washim: रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू; कुटुंबियांचा रुग्णालयावर गंभीर आरोप

वाशिम: वाशिम जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप गव्हाणे कुटुंबियांनी केला आहे. शिवानी गव्हाणे यांना रात्रीपासून तीव्र प्रसुतीवेदना होत असूनही कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्सेस लक्ष दिलं नाही असा आरोप नातेवाईक करत आहेत. तर संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु करण्याची मागणीही करण्यात आली आहे.   

वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालय येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप पळसखेड येथील लता नामदेव गव्हाणे यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टर, नर्स आणि खाजगी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन तातडीने चौकशी सुरु करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: पनवेल डान्सबार हल्लाप्रकरणी मनसे नेते योगेश चिलेसह आठ जण अटकेत

नेमकी घटना काय?

लता गव्हाणे यांच्या म्हणण्यानुसार त्यांची सून शिवानी वैभव गव्हाणे हिला 2 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजता प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणी करुन अहवाल नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले आणि सकाळी 10 वाजेपर्यंत प्रसूती होईल असे सांगण्यात आले. मात्र रात्रीपासून तीव्र प्रसुतीवेदना सुरू असूनही कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्सेस यांना वारंवार विनंती करुनही रुग्णाची दखल घेतली नाही.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे सतत विनंती करुनही सकाळी तीनपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोणीही आले नाही. अखेर सायंकाळी 5 वाजता तपासणी करण्यात आली, तेव्हा रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. त्यानंतर रुग्णावर अमानुष प्रकारे प्रसूतीसाठी दडपशाही करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.लता गव्हाणे यांनी सांगितले की, प्रसूती करताना रुग्णाच्या गालावर मारणे, अयोग्य पद्धतीने पोटावर दाब देणे, अप्रशिक्षित व्यक्तींमार्फत उपचार करणे असे प्रकार घडले. त्याचे ठसे रुग्णाच्या शरीरावर आजही स्पष्टपणे दिसत आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता प्रसूती झाली, पण डॉक्टरांनी बाळाच्या हृदयाचे ठोके नसल्याचे सांगून बाळ मृत असल्याचे जाहीर केले. लता गव्हाणे यांनी या संपूर्ण घटनेला रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.