प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला आहे.

कोल्हापुर सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर

कोल्हापूर : प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला आहे. प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल प्रशांत कोरटकरवर कारवाई करण्यात आली. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कोरटकरने इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने 24 मार्च रोजी तेलंगणातून कोरटकरला अटक करण्यात आली. त्यावेळीही कोरटकरने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर 25 मार्च रोजी कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी कोरटकरला सात दिवसांची द्यावी अशी मागणी केली होती. परंतु न्यायालयाकडून त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढे 28 मार्चलाही कोरटकरला न्यायालयाकडून कोरटकरला 30 मार्चपर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली. 

हेही वाचा : मुंब्य्रात 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या

कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 30 मार्च रोजी इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणावर सुनावणी करण्यात आली. यावेळी प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कोरटकरला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. अंडा सेलमध्ये प्रशांत कोरटकरवर दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर होती. शिवाय दोन कारागृह कर्मचारी देखील प्रशांत कोरटकरवर सतत लक्ष ठेवून असल्याचं बोललं जातं होतं. सुनावणी वेळी प्रशांत कोरटकरवर दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी कारागृहात सुरक्षित कोठडी देण्याची न्यायालयाला विनंती केली होती. वकिलांनी केलेल्या विनंतीनंतर कोरटकरला अंडासेलमध्ये स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले होते. 1 एप्रिल रोजी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र तेव्हाही कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र आता 9 एप्रिल रोजी प्रशांत कोरटकरला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.