पुण्यात एका मुजोर रिक्षावाल्याने उबरने प्रवास करणा

पुण्यात रिक्षाचालकांची गुंडगिरी! नागरिकांना रोजचा फुकटचा त्रास; पोलीस अद्याप गप्पच

Hooliganism Of Rickshaw Drivers In Pune: 'पुणे तिथे काय उणे' असे पुणेकरांकडून अभिमानाने म्हटले जाते. मात्र, आता या पुण्यात गुंडगिरी आणि गुन्ह्यांचेही उणे नसल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून तयार झाले आहे. तसेच, नावाजलेल्या पुणे पोलिसांच्या कीर्तीलाही उतरती कळा लागली आहे. रोज राजरोसपणे गुन्हे होणे, महिलांची छेडछाड-बलात्कार, जमिनीसाठी धमकावणे, जमिनींवर बेकारयदेशीर कब्जा, कुठल्या तरी श्रीमंत बापाच्या पोराने बेफाम गाडी चालवत निष्पाप लोकांची शिकार करणे असे गुन्हे रोजचे झाले आहेत. अनेकदा कायद्याचे रक्षक असलेले पोलीस आणि व्यवस्था सामान्य जनतेला संरक्षण देण्यापेक्षा धनदांडगे गुंड आणि पैसेवाल्या पॉवरबाजांनाच सलाम ठोकत असल्याचे चित्र आहे. यामुळे टेबलाच्या खालून-वरून फिरणाऱ्या चिरीमिरीचीही चर्चा आहे.

सध्या अनेक शहरांप्रमाणे पुण्यातल्या रिक्षाचालकांसोबत नागरिकांचे उडणारे खटके रोजचे झाले आहेत. अशाच एका रिक्षावाल्याने उबरने प्रवास करणाऱ्या महिलेचा रस्ता अडवला आणि तिला प्रवास रद्द करण्यास सांगितले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आजकाल उबर राईड्स लोकांसाठी एक उत्तम आणि सोयीस्कर पर्याय बनला आहे. आता रस्त्यावर ऑटो किंवा रिक्षा शोधण्याची कोणतीही समस्या नाही. कारण, उबरद्वारे कोणीही कुठेही सहज प्रवास करू शकतो. उबरवरून कॅब, बाईक, ऑटोरिक्षा बुक करता येते. दिवसाच्या वेळेनुसार यावरती भाडे दाखवले जाते आणि आपण ज्या ठिकाणापासून वाहन बुक केले आहे, तिथून पिक-अप सेवा मिळते. रिक्षा किंवा कॅब शोधण्यासाठी दूरवर जावे लागत नाही. यामुळे महागडे प्रवासभाडे टाळले जाणे, उत्तरल्यानंतर पैशावरून वाद होणे, चुकीचा मीटर दाखवणे हे टाळले जाते आणि ग्राहकांची सोय होते. मात्र, उबरमुळे काही स्थानिक ऑटो चालकांना त्यांच्या मनमानी कारभार करता येत नसल्यामुळे त्यांचा उबरवर नेहमीच आक्षेप असतो. पुणे, सोलापूर, नाशिकसारख्या इतर लहान-मोठ्या शहरांमध्येही हीच परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी नाशिमध्येही एका रिक्षावाल्याने चारचाकीतून कुटुंबासह जाणाऱ्या व्यक्तीला क्षुल्लक कारणावरून मारहाण केली होती.

हेही वाचा - नाशिकमध्ये रिक्षावाल्याची गुंडगिरी; कुटुंबीयांसह हात जोडून विनवण्या करणाऱ्या कारचालकाला शिवीगाळ करत मारहाण

काय प्रकरण होते? पुण्यातील हडपसर येथूनही असाच एक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका महिलेला आणि तिची उबर ऑटो चालवणाऱ्या चालकाला स्थानिक ऑटो रिक्षा चालकाने थांबवून अरेरावी करत हा प्रवास रद्द करण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. खरंतर, व्हिडिओमध्ये, एक महिला तिच्या मुलीला शाळेतून घेण्यासाठी उबर ऑटो बुक करते. पण ती ऑटोरिक्षा तिच्या सोसायटीच्या लॉबीमध्ये पोहोचताच. अचानक एक स्थानिक ऑटो रिक्षाचालक येतो आणि रस्ता अडवतो आणि विनाकारण वादावादीला सुरुवात करतो. या महिलेला रिक्षातून उतरण्यास सांगतानाच तो त्या उबर रिक्षाचालकालाही धमकी देऊ लागतो.

व्हिडिओ पहा

व्हायरल क्लिपमध्ये पुढे, स्थानिक ऑटो-रिक्षा चालक उद्धटपणे महिलेला उबर राईड रद्द करण्यास आणि ऑटोमधून उतरण्यास सांगतो. जेव्हा उबर ड्रायव्हर विरोध करतो तेव्हा तो माणूस ड्रायव्हरला धमकावू लागतो आणि त्याला राईड रद्द करण्यास आणि गाडी बाजूला पार्क करण्यास सांगतो. या संतापजनक प्रकारामुळे ती महिलाही चिडून 'तुझा काय संबंध' असे या अडवणूक करणाऱ्या स्थानिक ऑटोचालकाशी विचारते आणि त्याला चांगले खडसावते. यानंतर ती तिच्या ड्रायव्हरला रिक्षा पुढे घेऊन जाण्यास सांगते. यानंतर ही महिला बसलेली रिक्षा चालू लागते आणि ती महिला विनाकारण वादावादी करणाऱ्या रिक्षाचालकाच्या रिक्षाचेही मोबाईलवर शुटींग करते. या शुटींगमध्ये रिक्षाचा नंबर स्पष्ट दिसत आहे.

पुण्यातली ही पहिलीच घटना नाही. शहरातील अनेक भागात स्थानिक ऑटो चालक उबर, ओला कॅब आणि ऑटोंना धमक्या देतात. संगमवाडी येथून अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, जिथे भारत आणि महाराष्ट्राच्या काही भागांतून आलेल्या खाजगी बस प्रवाशांना उतरवतात आणि रिक्षाचालक त्यांना सोडतात.

हेही वाचा - कोर्टात महिलांनी केला अक्कू यादववर 70 वेळा चाकूने वार;2004 मधील सत्य घटना

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांचा संताप

घटनेचा व्हिडिओ @pulse_pune नावाच्या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्याला बातमी लिहिल्यापर्यंत 60 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच लोक स्थानिक ऑटो चालकावर प्रचंड संतापले आणि त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. एका वापरकर्त्याने लिहिले की, 'हा ऑटो ड्रायव्हर अगदी गुंडासारखा दिसतो.' त्याला अटक करून तुरुंगात टाकले पाहिजे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, 'हा माणूस ऑटो ड्रायव्हर दिसत नाही तर गुंड दिसतो.' तसेच, रिक्षातून न उतरता बेधडकपणे चालकास पुढे निघण्यास सांगणाऱ्या महिलेचेही कौतुक होत आहे. अशा सजग आणि निर्भीड नागरिकांची देशाला गरज असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांना रोष व्यक्त केला आहे. एकाने कमेंट केली की, “रिक्षाचालक आणि गुंडगिरी हे अतूट नाते आहे”

दुसऱ्याने कमेंट केली की, काल मी ऑफिसला जाण्यासाठी उबर बुक केली, पण जेव्हा ती आली तेव्हा ड्रायव्हर म्हणाला, “तुम्ही बुकिंग रद्द करा, आम्ही मीटरने जाऊ.” मी नकार दिला, मग तो म्हणाला, “ठीक आहे, ते रद्द करा, कारण गेल्या दोन दिवसांपासून सर्व ऑटो चालकांनी उबर ॲप वापरण्याऐवजी मीटरने जाण्याचा निर्णय घेतला आहे”.

तिसऱ्याने कमेंट केली की, “माझ्याबरोबर असेच घडले, ऑटोवाला 140 मागत होता तेव्हा रॅपिडोने 100 दाखवले, मी 120 पेक्षा जास्त पैसे देणार नाही असे सांगितले, तो म्हणाला रद्द करा. मी रद्द केले आणि 150 मध्ये कॅब बुक केली.”

मीटरसह छेडछाड

सध्या पुण्यातील प्रवाशांना उबर आणि ऑटो चालकांच्या नवीन करारामुळे अडचणी येत आहेत. पुणे येथील ऑटो चालकांनी उबरबरोबर केलेल्या नवीन कराराशी सहमती दर्शविण्याचा प्रयत्न करत असताना, पुणेकर आता मीटर छेडछाडीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

उबरसारख्या अ‍ॅग्रीगेटर अ‍ॅप्सद्वारे राईड्स बुक करूनही, ऑटो रिक्षा चालकांकडून कथित भाडे मीटर छेडछाडीमुळे जास्त पैसे आकारले जात असल्याचे पुण्यातील अनेक प्रवाशांनी नोंदवले आहे.

या एकंदरित प्रकारांमुळे या मुजोर रिक्षाचालकांचा आणि त्यांच्या संघटनांचा गॉडफादर कोण, याचाही विचार गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे. तसेच, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना-पुढाऱ्यांना निवडून देताना जनतेनेही विचार आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण, कुठल्याही राजरोसपणे आणि बिनधास्तपणे चालणाऱ्या गुन्ह्यांची पाळेमुळे कुठे असतात, याचा सर्वांनाच पुरेसा अंदाज आहे.

हेही वाचा - Santosh Deshmukh Murder Case : "माझं काही बरं-वाईट झालं तर.. म्हणत वडिलांनी सांगितलं, 'त्याचा' फोन होता," लेकीचा काळीज पिळवटणारा जबाब