पुण्यातील भरचौकात अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक
पोर्शे प्रकरणानंतर पुण्यात पुन्हा बेशिस्त वर्तनाचा संताप
पुणे: शहरातील येरवडा परिसरात भरचौकात कार थांबवून अश्लील वर्तन करणाऱ्या गौरव आहुजा या तरुणाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. मात्र, अटक टाळण्यासाठी गौरव आहुजाने पुण्यातून थेट कोल्हापूर गाठले आणि तिथून पुन्हा पुण्यात परत आला. शेवटी, सातारा पोलिस अधिक्षक समीर शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, कऱ्हाड येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.
महिलादिनाच्या दिवशीच भररस्त्यात उभ्या कारमधून अश्लील कृत्य केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यातील भाग्येश ओसवाल याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. मात्र, गौरव आहुजा पोलिसांना गुंगारा देत होता.
व्हायरल व्हिडिओमुळे वाढलेल्या दबावामुळे गौरव आहुजाने स्वतः व्हिडिओद्वारे माफी मागितली होती आणि लवकरच पोलिस ठाण्यात हजर होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, तो अद्याप फरारच होता. यावेळी साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कऱ्हाड पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले.
'आम्हाला माहिती आहे की औरंगजेब किती नालायक होता' - जरांगे
गौरव आहुजाने अटक टाळण्यासाठी अनेक डावपेच खेळले. तो कोल्हापूरच्या 20 किमी अलीकडे बीएमडब्ल्यू कार सोडून एका रिक्षाचालकाला धारवाडला जाण्यासाठी कार भाड्याने हवी असल्याचे सांगत होता. मात्र, वाटेतच त्याने गाडी पुण्याकडे वळवली आणि पुन्हा येरवड्यात परतला. त्याच्या या हालचालींमुळे प्रकरण अधिक गडद झाले.
अटकेनंतर गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. भाग्येशच्या शरीरात अल्कोहोलचे प्रमाण आढळले, तर गौरवचा अहवाल येणे बाकी आहे. विशेष म्हणजे, भाग्येशच्या मित्रांनी त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बर्गर आणि कोल्ड कॉफी पाठवली. मात्र, माध्यमांच्या उपस्थितीमुळे पोलिसांनी ती ऑर्डर नाकारली.
पोर्शे अपघात प्रकरणानंतर पुण्यातील नागरिक आधीच अस्वस्थ होते. त्यातच या नवीन घटनेने संतापाची लाट निर्माण झाली आहे. “अशा बेशिस्त वर्तनावर कठोर कारवाई व्हायला हवी,” अशी नागरिकांची मागणी आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या गैरवर्तनावर प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.