धक्कादायक! मुंबईतील अँटॉप हिलमध्ये नाल्यात आढळला नवजात अर्भकाचा मृतदेह
मुंबई: अँटॉप हिल परिसरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नाल्यात नवजात बाळाचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही बाब समजताच नागरिकांमध्ये चिंता आणि संताप व्यक्त केला जात आहे. स्थानीय रहिवाशाने नाल्यात काहीतरी संशयास्पद पाहिले. तथापी, जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांना येथे नवजात बाळाचा मृतदेह आढळला. त्यांनी तातडीने अँटॉप हिल पोलिसांना याची माहिती दिली.
अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल -
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. बाळाच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तथापी, याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कोण जबाबदार आहे, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. जवळपासच्या नर्सिंग होम्स आणि रुग्णालयांमध्ये अलीकडील बाळंतपणाच्या नोंदींची माहिती गोळा केली जात आहे.
हेही वाचा - Chhtrapati Sambhajinagar Crime : आईचा मोबाईल देण्यास नकार, अल्पवयीन मुलाची डोंगरावरून उडी
पोलीसांकडून तपास सुरू -
अँटॉप हिल पोलिस स्टेशनमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सीसीटीव्ही फुटेज आणि हॉस्पिटलच्या नोंदींवर आधारित तपास सध्या सुरू आहे. बाळाला टाकणाऱ्या व्यक्तीची लवकरच ओळख पटवण्यात येईल. ही घटना मानवीतेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित करते. समाजात अशा घटनांना आळा बसावा यासाठी प्रशासन आणि नागरिकांना एकत्र येणे आवश्यक आहे.