ATM Robbery in Jalgaon: जळगावमध्ये चोरट्यांकडून एटीएम लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरू
ATM Robbery in Jalgaon: जळगावमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. रात्री उशिरा घडलेल्या एका नाट्यमय घटनेत चोरट्यांनी महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून ते फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. व्हिडिओमध्ये दोन चोरटे तोंडावर कापड बांधून एटीएममध्ये घुसण्याचा आणि कॅमेऱ्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र फुटेज अपूर्ण असल्याने चोरी यशस्वी झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सांगितले की, ही घटना बुधवारी घडली.
याआधीही घडला होता असा प्रकार
गेल्या महिन्यात छत्रपती संभाजीनगरमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाहनूरवाडी शाखेत चोरट्यांनी एटीएम खेचून नेण्याचा प्रयत्न केला होता. चार चोर एसयूव्हीमधून आले आणि त्यांनी पिवळ्या रंगाच्या बेल्टने एटीएम बांधून वाहनाच्या मदतीने खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले.
यावेळी चोरट्यांनी केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेरे खराब केले आणि स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने कॅश डिस्पेंसर उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी हाती काही लागले नाही आणि ते पसार झाले. शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा - ISIS Terrorist Arrest: ISIS शी संबंधित 5 दहशतवाद्यांना अटक; बॉम्बस्फोटाचा कट उधळला
पोलिसांचा तपास सुरू
जळगाव प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. अशा घटना वाढत असल्यामुळे बँका आणि एटीएम केंद्रांमध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होतं आहे.