महादेव मुंडे हत्या प्रकरण: पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातच घेतलं विष
बीड: महादेव मुंडे हत्या प्रकरणाला दीर्घ कालावधी उलटूनही न्याय मिळत नसल्याने अखेर मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी थेट बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन विषारी औषध प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे.
या घटनेने प्रशासनात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली असून, गेल्या 18 महिन्यांपासून सुरू असलेल्या त्यांच्या संघर्षाला न्यायाची जोड मिळाली नसल्याने त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले, असा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे या पतीच्या हत्येनंतर न्यायासाठी सातत्याने प्रयत्नशील होत्या. त्यांनी याआधीही प्रशासनाला वेळोवेळी इशारे दिले होते. न्याय मिळत नाही, तर आत्मदहनाचा इशारा देखील त्यांनी यापूर्वी दिला होता. मात्र तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. आज त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचून थेट विष प्राशन केल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे न्याय कधी मिळणार? असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये आणि मुंडे समर्थकांमध्ये उपस्थित झाला आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणात न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा: महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात?
महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम
20 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी महादेव मुंडे यांनी ट्युशनवरून मुलांना घरी सोडल्यानंतर नेहमीप्रमाणे पिग्मी कलेक्शनसाठी बाहेर पडले. सायंकाळी 7:10 वाजता ते शेवटचं शिवाजी चौकात सीसीटीव्हीमध्ये दिसले. त्यानंतर आझाद चौकात एका मित्राला भेटले. रात्री 9 वाजता त्यांच्या मोटरसायकल आझाद चौकापासून 300 मीटरवर वनविभाग कार्यालयासमोर सापडली. गाडीवर रक्ताचे डाग होते आणि त्यामध्ये ओळखपत्रे, बँकेची कागदपत्रे होती. गाडी शेजारी दोन चपला आढळल्या; त्यातील एक त्यांच्या होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 50 मीटर अंतरावर मृतदेह सापडला. प्रश्न उपस्थित होतो की, रात्री पोलिसांना मृतदेह का दिसला नाही? गळा कापलेला, शरीरावर वारांचे खुणा होत्या. मृतदेहासोबत मोबाईल, अंगठी, लॉकेट व 1-1.5 लाखांची रक्कम गायब होती. पोलिसांनी आठ दिवसांत आरोपी मिळवण्याचे आश्वासन दिल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महादेव मुंडे यांचा खून पूर्वनियोजित होता की लुटमारीसाठी? हे अजूनही गूढ आहे.