बेटिंग अॅप प्रकरणात अभिनेता प्रकाश राज ED समोर हजर
हैदराबाद: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बेटिंग अॅप्सच्या जाहिरात प्रकरणात चित्रपट अभिनेता प्रकाश राज यांची चौकशी केली. ते बुधवारी हैदराबादच्या बशीरबाग येथील प्रादेशिक कार्यालयात हजर झाले. सायबराबाद पोलिसांनी मार्च महिन्यात या प्रकरणात प्रकाश राज यांच्यासह इतर काही कलाकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. प्रकाश राज यांनी स्पष्ट केले होते की, 2017 मध्ये त्यांनी एका अॅपसाठी जाहिरात करण्याचा करार केला होता. परंतु नंतर संबंधित अॅपविषयी अधिक माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जाहिरातीतील सहभाग नाकारला होता.
दरम्यान, ईडीने याच प्रकरणात राणा दग्गुबती, विजय देवरकोंडा, लक्ष्मी मंचू आणि अनन्या नागल्ला यांच्यासह अनेक नामांकित सेलिब्रिटींना समन्स बजावले आहेत. विजय देवरकोंडाला 6 ऑगस्टला आणि लक्ष्मी मंचूला 13 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
हेही वाचा - Sushant Singh Rajput death case: सुशांत मृत्यू प्रकरणात नवे वळण; रिया चक्रवर्ती
प्राप्त माहितीनुसार, जंगली रम्मी, ए23, जीतविन, परिमॅच, लोटस 367 यांसारख्या बेकायदेशीर बेटिंग अॅप्सचा प्रचार करून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला. या प्रकरणात एकूण 29 सेलिब्रिटींची चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये अनेक टीव्ही कलाकार, होस्ट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा समावेष आहे.
हेही वाचा - प्रकाश राज यांच्या अडचणी वाढल्या; सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी ED कडून गुन्हा दाखल
दरम्यान, याप्रकरणी तेलंगणा व आंध्र प्रदेशातील पाच पोलिस ठाण्यांमध्ये पाच एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (PMLA) कारवाई केली जात आहे. ईडीने यास गंभीर स्वरूपाचे आर्थिक अपप्रवृत्तीचे प्रकरण मानले आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडी या प्रकरणी अनेक कलाकारांची चौकशी करत आहे.