ब्राह्मण समाजाविरुद्ध आक्षेपार्ह आणि अपमानास्पद टि

ब्राह्मण समाजावरील टिप्पणीप्रकरणी अनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या; मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

Anurag Kashyap

मुंबई: ब्राह्मण समुदायावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ब्राह्मण समाजाविरुद्ध आक्षेपार्ह आणि अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल अनुराग कश्यप यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गेल्या काही दिवसांपासून प्रतीक गांधी आणि पत्रलेखा अभिनीत 'फुले' चित्रपटावर टीका होत आहे. चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांनी याचा निषेध केला आणि भारतात जातीच्या मुद्द्यांवर आधारित चित्रपटांवर बंदी घालण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, चित्रपटातील काही दृश्ये संपादित करण्याच्या सेन्सॉर बोर्डाच्या शिफारसीचा त्यांनी निषेध केला. फुले चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून ब्राह्मण समाजाकडून चित्रपटावर आक्षेप घेतले जात होते. ज्यावर कश्यप यांनी ब्राह्मणवाद आणि जातिवादावर अनेक पोस्ट लिहिल्या होत्या. अनुराग कश्यप यांच्या ब्राम्हण समाजावरील काही आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा - मुंबई उच्च न्यायालयाचा कुणाल कामराला दिलासा! न्यायालयाने मुंबई पोलिसांना विचारला 'हा' प्रश्न

कोणी केली तक्रार?  

मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी अनुराग कश्यपविरुद्ध मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, अनुराग कश्यपने 'फुले' चित्रपटाच्या प्रमोशनच्या उद्देशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये ब्राह्मण समुदायाबद्दल अपमानास्पद शब्द वापरले आहेत. हे निश्चितच द्वेषपूर्ण भाषणाच्या श्रेणीत येते, असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. 

हेही वाचा - Zaheer Khan Become Father: झहीर खानच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन! सागरिकाने दिला गोंडस मुलाला जन्म

अनुराग कश्यपविरुद्ध कारवाईची मागणी - 

तक्रारदारांच्या मते, ब्राह्मण समाजाची बदनामी करण्यासाठी प्रसिद्धीच्या उद्देशाने ही टिप्पणी करण्यात आली होती. तक्रारीत भारतीय दंड संहिता, 2023 च्या कलम 196, 197, 298, 302, 356 (3), 356(4) आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.