Zubeen Garg Death: आसाम सरकार जुबिन गर्ग यांच्या मृत्यूची चौकशी करणार; गायकाच्या निधनामुळे 3 दिवसांचा राज्य शोक जाहीर
Zubeen Garg Death: आसाम सरकारने गायक जुबिन गर्ग यांच्या निधनानंतर तीन दिवसांचा राज्य शोक जाहीर केला आहे. मुख्य सचिव रवी कोटा यांनी एक्सवर पोस्ट करत ही घोषणा केली. शुक्रवारी सिंगापूरमध्ये समुद्रात पोहताना गुदमरून प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांचा मृत्यू झाला. मुख्य सचिवांनी सांगितले की, 'प्रसिद्ध गायक, चित्रपट निर्माते आणि सांस्कृतिक व्यक्तिमत्व जुबिन गर्ग यांच्या निधनाबद्दल आसाम सरकार तीव्र दुःख व्यक्त करते.'
हा राज्य शोक 20 ते 22 सप्टेंबरपर्यंत राहणार असून या काळात कोणतेही अधिकृत मनोरंजन, जेवण किंवा औपचारिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. तथापी, गर्ग यांच्या निधनामुळे सेवा सप्ताह कार्यक्रम देखील पुढे ढकलण्यात येणार आहेत. मात्र, आरोग्य शिबिरे, क्षयरोग रुग्णांसाठी निक्षय मित्र मदत आणि वृक्षारोपण मोहिमेसारखे सेवा-केंद्रित उपक्रम सुरू राहतील.
जुबिन गर्ग यांच्या कुटुंबीय शोकाकुल असून, सिंगापूरहून गुवाहाटी येथे त्यांचे पार्थिव आणण्याची तयारी करत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी शनिवारी सांगितले की, त्यांच्या मृत्यूची राज्य सरकार चौकशी करेल. ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजक श्यामकानु महंता आणि गायकाचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांच्याविरुद्ध मोरीगाव पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, आसाम पोलीस महंत, सिद्धार्थ शर्मा आणि जुबिनच्या शेवटच्या क्षणी उपस्थित असलेल्यांची चौकशी करतील. अपघाताच्या आधी गर्ग एका पार्टीत नेण्यात आल्याचे वृत्त आहे, हे खरे आहे का ते आम्ही शोधू. तथापी, मुख्यमंत्रीने असेही स्पष्ट केले की, झुबीनचा मृत्यू लाईफ जॅकेटशिवाय पोहताना झाला आणि भारताबाहेर घडलेल्या या घटनेत गुन्हेगारी दृष्टिकोन असल्यास संबंधित देशाकडून माहिती मागवली जाईल. राज्य सरकार संबंधित सर्व पैलूंची निष्पक्ष चौकशी करेल.