'मी खांबामागे..' पत्नी ताहिराला कर्करोग झाल्याचं कळताच ‘अशी’ झाली होती आयुष्मान खुरानाची स्थिती
Tahira Kashyap Relapse Breast Cancer: अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी व चित्रपट निर्माती ताहिरा कश्यपला पुन्हा एकदा कर्करोगाचं निदान झालं आहे. 7 वर्षांपूर्वी ताहिराला 2018 मध्ये पहिल्यांदा कर्करोग झाल्याचं समजलं होतं. उपचारानंतर तिने या गंभीर आजारावर मात केली होती. त्यानंतर आता तिला पुन्हा एकदा स्तनांचा कर्करोग असल्याचं समोर आलं आहे. ताहिराने यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली आहे.
ताहिरा कश्यपने पोस्टमध्ये काय म्हटलंय? 42 वर्षीय ताहिराने इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केल्यानंतर तिचे चाहते तिला धीर देत आहेत. 'सात वर्षांच्या नियमित तपासणीची शक्ती. खरं तर हा एक दृष्टीकोन आहे. ज्यांना नियमित मॅमोग्रामची गरज आहे, त्या सर्वांना मी हेच सुचवेन. माझ्यासाठी दुसरा राउंड…मला पुन्हा कर्करोगाचं निदान झालंय,' असं ताहिराने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
ताहिराला 2018 मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर तिने उपचार घेऊन यावर मात केली. नंतर ताहिराने याबद्दल जनजागृती केली आणि तिने तिच्या कर्करोगाच्या प्रवासाविषयी माहितीही दिली. तिने स्तनांच्या कॅन्सरच्या उपचारादरम्यान शरीरावर झालेल्या खुणा दाखवल्या होत्या. जागतिक कर्करोग दिनानिमित्त ताहिराने उपचारादरम्यान केस गेले तेव्हाचे टक्कल असलेले फोटो पोस्ट केले होते.
हेही वाचा - CID निर्मात्यांनी केली ACP प्रद्युमन यांच्या मृत्यूची घोषणा, चाहत्यांमध्ये संतापाची लाट
ताहिराला पहिल्यांदा कर्करोगाचे निदान झाले तेव्हा आयुष्मानसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. 2019 मध्ये एका पॉडकास्टमध्ये आयुष्मान खुरानाने एक प्रसंग सांगितला होता. जेव्हा त्याला कळलं की त्याच्या पत्नीला कर्करोग आहे, तेव्हा त्याची अवस्था कशी झाली होती, त्याबाबत आयुष्मानने सांगितलं होतं. 'डॉक्टरांनी आम्हाला हे सांगितलं तेव्हा आम्ही दोघे दिल्लीत होतो. आम्हाला आधी काहीच माहीत नव्हतं. एक वेळ अशी आली की आम्ही हादरलो होतो आणि हॉस्पिटलमध्ये बसलो होतो. आमची अशी स्थिती असताना तिथल्या लोकांना माझ्याबरोबर फोटो काढायचे होते. (आम्ही ज्या स्थितीतून जात होतो, त्याविषयी त्यांना काहीच माहिती नव्हती. ते फॅन्स असल्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडत्या हिरोला पाहण्यासाठी उत्साहात होते. त्यामुळे हा प्रकार घडला.) पण मी एका खांबामागे लपलो होतो. सुरक्षा रक्षकालाही वाईट वाटत होतं,' असं आयुष्मान खुराना माय एक्स-ब्रेस्ट पॉडकास्टमध्ये म्हणाला होता.
आयुष्मानने केलं होतं ताहिराचं कौतुक ज्या पद्धतीने ताहिराने हिमतीने या आजाराशी लढा दिला ते पाहून आयुष्मान खुरानाने तिचं कौतुक केलं होतं. ताहिराला या आजारपणात अध्यात्माची खूप मदत झाली, असं आयुष्मानने सांगितलं होतं. 'निचिरेन बौद्ध धर्म लढण्याची हिंमत देतो. आता तू माझ्यासाठी एक विजयी राणी आहेस. मला खूप आनंद झाला की, तू भावनिकदृष्ट्या इतकी मजबूत झाली आहेस की ही लढाई लढू शकतेस. या लढ्यात आपण दोघेही एकत्र होतो, पण मला तुझ्याकडून इतकी प्रेरणा मिळाली की, तू माझ्यापेक्षा अधिक मजबूत झालीस. मी तुझ्या व्यक्तिमत्त्वाविषयी हे म्हणत आहे. कारण, तुला आलेल्या कठीण अनुभवांमधून ते घडलं आहे.'
आयुष्मान व ताहिराची लव्ह स्टोरी आयुष्मान व ताहिरा 12 वीत एकत्र होते. कोचिंग क्लासदरम्यान त्यांची ओळख झाली. आयुष्मान व ताहिरा दोघांचे वडील एकाच वृत्तपत्रासाठी काम करायचे, ते एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र, आयुष्मान व ताहिरा यांना त्यांचे वडील एकमेकांचे मित्र असल्याचं माहीत नव्हतं. एकेदिवशी दोघांच्या वडिलांनी जेवणाचा प्लॅन केला. तेव्हा ते दोघेही एकमेकांना एकाच ठिकाणी बघून चकित झाले. तिथे आयुष्मानने ‘हमे तुमसे प्यार कितना’ हे गाणं गायलं आणि ताहिरा त्याच्या प्रेमात पडली. दोघांनी काही वर्षे डेट केल्यानंतर 2008 मध्ये लग्नगाठ बांधली. आयुष्मान आणि ताहिरा यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.
ताहिरा कश्यपने ‘पिन्नी और टॉफी’ ही शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली होती. तसेच ‘शर्मा जी की बेटी’चं दिग्दर्शनही तिने केलं होतं. या चित्रपटात दिव्या दत्ता व सैयामी खेर हे कलाकार होते.