Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनय क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दूरदर्शनवर 1979 मध्ये प्रसारित झालेल्या चिमणराव या मालिकेत त्यांनी गुंड्याभाऊची भूमिका साकारली होती. चिमणरावमध्ये साकारलेल्या भूमिकेने ते घराघराच पोहोचले. त्यांच्या भूमिकेवर लोकांनी भरभरुन प्रेम केलं. त्यांना इंडस्ट्रीतही गुंड्याभाऊ या नावाने ओळखले जाते. पुण्यातील इंजिनिअर ते अभिनेते असा त्यांचा प्रवास अविस्मरणीय होता.
बाळ कर्वे यांचा जन्म 25 ऑगस्ट 1930 मध्ये झाला. त्यांचे खरे नाव बाळकृष्ण होते. परंतु त्यांना सगळे बाळ या नावाने हाक मारत होते. पुढेही हेच रुढ झालं. रंगकर्मी विजया मेहता हे त्यांचे नाट्यक्षेत्रातील गुरु होते. चिमणराव ही त्यांची पहिली मालिका होती. या मालिकेत त्यांनी गुंड्याभाऊ हे पात्र साकारले होते. याच गुंड्याभाऊ या पात्राला खूप लोकप्रियता मिळाली. तसेच गुंड्याभाऊ या पात्राने खूप ओळख मिळवून दिली. आजही विलेपार्ल्यातून फिरताना लोक गुंड्याभाऊ म्हणूनच ओळखतात असे कर्वे यांनी मुलाखतीत सांगितले होते.