Chhaava Box Office Collection day 2: 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर दहाड, दुसऱ्या दिवशी कमाईत प्रचंड वाढ
'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकलं आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. देशभरात अनेक चित्रपटगृहात हाऊसफुल्लचे बोर्ड लागत आहेत.
चित्रपट प्रदशर्नाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, 'छावा' ने भारतात 31 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 'छावा' च्या कमाईमध्ये वाढ झाली आहे. 'छावा' ने दुसऱ्या दिवशी 36.5 कोटी रुपयांची बंपर कमाई केली. 'छावा' च्या दोन दिवसांची एकूण कमाई 67.5 कोटी रुपये झाली आहे.
हेही वाचा - ममता महामंडलेश्वर पदावरच राहणार; राजीनामा स्वीकारण्यास त्रिपाठींचा नकार
वर्ल्डवाइड कलेक्शन शंभरीपार
वर्ल्डवाइड कलेक्शनबाबत बोलायचे झाल्यास, 'छावा' ने पहिल्या दिवशी 47.25 कोटी रुपये कमावले. ज्यामध्ये भारतातील 31 कोटी आणि इतर देशांतील 10 कोटींचा समावेश आहे. दुसऱ्या दिवशी भारतात 36.5 कोटी आणि इतर देशांमध्ये 25 कोटींची कमाई झाली. ज्यामुळे 'छावा'ची एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन 102.5 कोटी रुपये झाली आहे.
'छावा' चित्रपटाची कथा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. ज्यात विकी कौशल याने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका निभावली आहे. चित्रपटाच्या भव्यदिव्य दृश्यांमुळं आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळं या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
पहिल्याच आठवड्यात 100 करोड क्लबमध्ये सामिल
130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला 'छावा' चित्रपट आपल्या पहिल्याच आठवड्यात उत्पादन खर्च वसूल करण्याच्या मार्गावर आहे. खासकरून मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई येथे चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
'छावा' चित्रपटाच्या गाण्यांनीही सोशल मीडियावर धूम केली आहे. ज्यामुळं चित्रपटाच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडली आहे. थिएटरबाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. एकूणच 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे आणि विकी कौशलच्या करिअरमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.