Chhaava Review : चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'महाराष्ट्राला कायम गद्दारीने... नाहीतर, औरंगजेब...'
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला बहुप्रतिक्षित छावा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. विकी कौशल, रश्मिका मंधाना आणि अक्षय खन्ना यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. सध्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा असल्यामुळे राजकीय मंडळीही हा चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही हा चित्रपट पाहिला असून त्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलंय. यावर प्रतिक्रिया नोंदवताना 'महाराष्ट्राला गद्दारीने कायम शाप दिलाय. दुहीची बीजं इथे पाषाणावरही उगवतात,' असं आव्हाड म्हणाले.
हेही वाचा - Valentine Week : 15 व्या वर्षी अभिनेत्री रेखासोबत सेटवर घडला होता असा प्रकार, कधीच लाभलं नाही 'खरं प्रेम'
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर लिहिलंय, 'छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा आलेख असलेला ‘छावा’ सिनेमा आताच पाहिला. विकी कौशलचा अप्रतिम अभिनय, कलाकारांची उत्कृष्ट निवड, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि चित्रिकरण, पटकथा- संवाद यामुळे हा सिनेमा खरंच छान झाला आहे. एक मात्र सत्य या सिनेमात दाखवलंय ते म्हणजे, छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब कधीच हरवू शकला नसता.'
'महाराष्ट्राला लागलेला शाप तेव्हाही जिवंत होता; तो म्हणजे गद्दारी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर सातत्याने गद्दारी होत गेली ती छत्रपती संभाजी महाराजांच्या मरणापर्यंत! एकाही युद्धात औरंगजेब त्यांना हरवू शकला नाही. पण, अखेरीस स्वकीयांनीच घात केला अन् संगमेश्वरला ते पकडले गेले. तिथे जर घात झाला नसता तर संगमेश्वरहून ते अकलूजला औरंगजेबाच्या छावणीवर चाल करून गेले असते अन् औरंगजेबाचा पराभव केला असता आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलला असता. पण, महाराष्ट्राला गद्दारीने कायम शाप दिला आहे की दुहीची बीजं इथे पाषाणावरही उगवतात', असं आव्हाड यांनी म्हटलंय.
हेही वाचा - Viral Video : साप चावल्यावर किती विष सोडतो? नेटिझन्स म्हणाले, अरे बापरे.. मग काय वाचेल माणूस!
चित्रपट पाहायला जाण्याआधीही जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केली होती. त्यात त्यांनी 'इथल्या जातीयवादी- मनुवाद्यांनी कायम छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले. या मागील कारण म्हणजे त्यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील प्रभाव आणि त्यांचा माणसे ओळखण्याचा वकूब', असं म्हटलं होतं.
‘छावा’चे बजेट Chhaava Budeget: लक्ष्मण उतेकर यांनी 4 वर्षे अभ्यास करून छत्रपती संभाजी महाराजांवरील हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटासाठी कलाकारांनीही प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी तब्बल 130 कोटी रुपये खर्च केलेत. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच त्याची कमाई बजेटची रक्कम वसूल करेल, असं दिसत आहे.