जगातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सपैकी एक म्हणून ओळखले

Giorgio Armani Died : प्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी यांचं निधन; कोट्यवधी संपत्तीच्या 'अरमानी' ब्रँडचा वारसदार कोण? चर्चांना उधाण

नवी दिल्ली: जगातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सपैकी एक म्हणून ओळखले जाणारे जॉर्जियो अरमानीचे 4 सप्टेंबर 2025 रोजी वयाच्या 91व्या वर्षी मिलान येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. जॉर्जियो अरमानी यांच्या निधनाने जगभरातील फॅशन जगतात आणि चाहत्यांमध्ये शोककळा परसली आहे. अरमानी यांनी 12.1 अब्ज डॉलरचे साम्राज्य उभे केले. अरमानीने आपला व्यवसाय केवळ फॅशन क्षेत्रातच नव्हे, तर हॉटेल्स, परफ्यूम्स आणि इतर क्षेत्रांमध्येही वाढवला. मात्र, जॉर्जियो अरमानी यांना वारसदार नसल्याने, त्यांच्या संपत्तीची आणि कंपनीच्या भविष्याची जबाबदारी कोण घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.  

कोण आहेत जॉर्जियो अरमानी?

11 जुलै 1934 रोजी इटलीतील पिआसेंझा येथे जॉर्जियो अरमानी यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण दुसऱ्या महायुद्धाच्या कष्टांनी भरलेले होते. जॉर्जियो अरमानी यांना डॉक्टर बनन्याची इच्छा होती. मात्र, फॅशनमध्ये करिअर करण्यासाठी त्यांनी वैद्यकीय शाळा सोडली. 1957 पासून अरमानी मिलान डिपार्टमेंट स्टोअर ला रिनासेंटेमध्ये खरेदीदार म्हणून काम करत होते. मिलान डिपार्टमेंट स्टोअर ला रिनासेंटे येथे सात वर्षे काम केल्यानंतर, त्यांनी फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर सुरू केले. 1975 मध्ये अरमानीचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार सर्जियो गॅलिओटी यांच्या मदतीने, अरमानीने पुरुष आणि महिलांसाठी तयार कपडे असलेले स्वतःचे लेबल लाँच केले.

विशेष म्हणजे, 1980 च्या दशकात जेव्हा हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गियरने अरमानीने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला. तेव्हा, अरमानीने डिझाइन केलेल्या ड्रेसची सर्वत्र चर्चा होऊ लागली. तसेच, विविध अभिनेत्यांमध्ये अरमानीने डिझाइन केलेल्या ड्रेसची मागणी वाढली. तेव्हापासून अरमानीचा ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. 

अरमानी ब्रँडच्या व्यवसायाची जबाबदारी कोणाला दिली जाईल?

प्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानीला मुले नाहीत. जॉर्जियो अरमानी त्याच्या भाची रॉबर्टावर खूप प्रेम करत असे. पण रॉबर्टाने तिच्या चित्रपट कारकिर्दीला पुढे नेण्यासाठी अरमानी ग्रुपमध्ये पब्लिक रिलेशन डायरेक्टरची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, जॉर्जियो अरमानीच्या निधनानंतर, त्यांच्या वारसदाराबद्दल चर्चा सुरू झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जॉर्जियो अरमानी यांनी पूर्वीच त्यांच्या वारसदाराबाबत विचार केला होता. अरमानी कंपनीतील विश्वासू सहकारी डेल'ऑरको किंवा कुटुंबातील सदस्य सिल्वाना अरमानी यांना अरमानीच्या व्यवसायाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच, त्यांच्या वारसदाराबद्दल अधिकृत घोषणा केली जाईल.