Raza Murad Death Hoax: 'मी जिवंत आहे...'; मृत्यूच्या अफवांवर रझा मुराद संतापले, पोलिसात तक्रार दाखल
Raza Murad Death Hoax: ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील अंबोली पोलिस ठाण्यात शुक्रवारी, 22 ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, त्यांच्या मृत्यूबाबतची बनावट पोस्ट ऑनलाइन पसरत आहे, ज्यामुळे त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
74 वर्षीय रझा मुराद यांनी एएनआयशी बोलताना स्पष्ट केले की, कोणीतरी माझ्या निधनाबाबत सोशल मीडियावर खोटी बातमी अपलोड केली. अशा लोकांची मानसिकता संकुचित असते आणि त्यांना इतरांचे चांगले काम सहन होत नाही. मी या गोष्टीकडे आता दुर्लक्ष करणार नाही. लोक आमच्या मौनाचा गैरवापर करतात. त्यामुळेच मी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. रझा मुराद यांनी म्हटलं आहे की, मी जिवंत आहे हे लोकांना सांगून माझा घसा, जीभ आणि ओठ सुकले आहेत. जगभरातून मला फोन आणि मेसेज येत आहेत. लोक स्क्रीनशॉट पाठवत आहेत. ही खोटी बातमी अत्यंत लज्जास्पद आहे.
अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई
दरम्यान, रझा मुराद यांनी सांगितले की पोलिसांनी त्यांचे एफआयआर नोंदवले असून, जबाबदार व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. अनेकदा सेलिब्रिटींना जिवंत असताना त्यांना मृत घोषित केले जाते. हे चुकीचे आहे आणि जो कोणी हे करतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे ठाम मत त्यांनी यावेळी माध्यमांसमोर मांडले.
हेही वाचा - Elvish Yadav House Firing: यूट्युबर एल्विश यादवच्या घरावर गोळीबारप्रकरण, अखेर मुख्य आरोपीचा एन्काऊंटर
चाहत्यांमध्ये संभ्रम -
रझा मुराद यांच्याबाबतची ही खोटी बातमी सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अभिनेत्याने स्वतः पुढे येऊन सत्य स्पष्ट केले. तसेच सर्वांना खात्री दिली की, ते पूर्णपणे ठणठणीत आहेत.