Stray Dogs Case : 'भटक्या कुत्र्यांवर इतकाच जीव असेल तर तुमच्या घरी घेऊ जा', सर्वोच्च न्यायालयाला निर्णयाला राहुल वैद्यचा पाठिंबा
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिलेल्या आदेशानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. दिल्ली- एनसीआरमध्ये हजारो भटक्या कुत्र्यांनी उपद्रव मांडला आहे. यामुळे दिल्लीत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला. म्हणून भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाला अनेक सेलिब्रिटींनी विरोध दर्शवला. मात्र गायक राहुल वैद्य याने कोर्टाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी त्याने काही वर्षांपूर्वीचा अनुभवही सांगितला.
राहुल वैद्यने सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयला समर्थन दर्शवलं आहे. वैद्यने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवत न्यायालयाच्या निर्णयला पाठिंबा दिला आहे. राहुलने लिहले की, "मी माननीय न्यायालयाच्या निर्णयाचं समर्थ करतो. मला कुत्रा हा प्राणी आवडतो, पण गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे, फिरणारे कुत्रे समाजाचा निष्काळजीपणा दर्शवतात, करुणा नाही".
राहुलने सोशल मीडियावर दिखावा करणाऱ्यांपेक्षा प्रामाणिकपणे मदत करण्याचे आवाहन केले. जर इतकाच भटक्या कुत्र्यांवर जीव असेल, तर कृपयाकरुन त्यांना तुमच्या घरी घेऊन जा. केवळ सोशल मीडियावर मोठ्या स्टोरीज टाकून आणि न्यायालयाच्या निर्णयावर टीका करुन वादात भर घालू नका. न्यायालयाच्या निर्णयाचा प्राणी प्रेम आणि करुणा या मुद्द्यांशी काहीही संबंध नाही.
"माझा शेवटचा प्रश्न - जर तुमच्या आई- वडिलांना किंवा लहान मुलांना भटक्या कुत्र्याने चावा घेतला तर तुमचा दुष्टिकोन असाच राहील का?", असा सवाल राहुलने न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना विचारला आहे.
राहुलने 2021 मधील एक अनुभव सांगितला, जेव्हा एका प्रसिद्ध अभिनेत्यानं पाळलेल्या भटक्या कुत्र्यानं त्याचा चावा घेतला होता. सोबत त्यांनं जखमेचा फोटोही टाकला.अभिनेत्याचं नाव उघड न करता, राहुलनं स्पष्ट केलं की, मुद्दा न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाणाऱ्या लोकांबद्दल आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय? दिल्ली - एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरुन आश्रयस्थानांमध्ये स्थलांतरित करण्याचा आदेश न्या. जे.बी. पारडीवाला आणि न्या.आर. महादेवन यांच्या खंडपीठाने 11 ऑगस्ट रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला होता. सुरुवातीला पाच हजार कुत्र्यांसाठी आश्रयस्थान तयार करण्याची सूचना खंडपीठाने दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर फिरु न देण्याच्या निर्णयावर जान्हवी कपूर, वरुण धवन, केतकी माटेगावकर, आदी सेलिब्रिटींनी विरोध केला. मात्र गायक राहुल वैद्य याने सर्वसामान्यांचा विचार करुन न्यायालयाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. वैद्यच्या या पाठिंब्यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे.