Ganesh Visarjan 2025: मुंबईत गणेश विसर्जनावर 'या' अभिनेत्रीने व्यक्त केला संताप; नेटिझन्सचा पलटवार; ‘असे लोक मुंबईत राहण्याच्या लायकीचे ...
मुंबई: गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्राच्या गल्ल्यागल्ल्यांत दणदणणारे ढोल-ताशे, रंगीत मिरवणुका आणि भक्तीचा जल्लोष हे चित्र दरवर्षी पाहायला मिळतं. पण यंदा एका अभिनेत्रीने या आवाजावर आक्षेप घेतल्याने नवा वाद रंगला आहे. ‘बिग बॉस 18’ फेम कशिश कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकून गणेश विसर्जनावेळी होणाऱ्या ढोल-ताशांच्या गजरावर नाराजी व्यक्त केली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.
कशिशची तक्रार काय होती?
कशिश कपूर मुंबईत एका उंच इमारतीत राहते. तिने व्हिडिओमध्ये सांगितलं की, 'मी 20व्या मजल्यावर राहते, तरीसुद्धा खाली वाजणाऱ्या ढोलांचा आवाज माझ्या घरात पोहोचतो आणि डोकं ठणकतं. भक्ती म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणं नाही. विसर्जन आहे हे मान्य, पण ढोल जर अर्धा ते एक तास वाजले तर ठीक आहे. मात्र, साडेतीन तास सतत वाजले की त्याचा त्रास होतो.'
तिने पुढे सांगितलं, 'बाप्पा खूश होण्यासाठी इतका मोठा आवाज आवश्यक नाही. ढोल जर थोड्या आवाजात वाजवले तरही भक्ती होते. आवाजाचा अतिरेक टाळला पाहिजे.' हेही वाचा: Jaya Bachchan: जया बच्चन यांनी दगडूशेठ बाप्पाला अर्पण केले होते सोन्याचे कान, अमिताभसाठी केलेला नवस; कारण ऐकून थक्क व्हाल
नेटकऱ्यांचा संताप
कशिशच्या या वक्तव्यावर काहींनी तिचं समर्थन केलं, मात्र बहुसंख्य लोकांनी तिला खडे बोल सुनावले. एका युजरने लिहिलं, 'पार्टी आणि क्लबमधला मोठा आवाज सहन होतो, पण भक्तीच्या तीन तासांचा आवाज मात्र असह्य वाटतो? हे दुटप्पीपण आहे.' दुसरा म्हणाला, 'महाराष्ट्रात राहून गणेश विसर्जनावर तक्रार करणं म्हणजे इथल्या संस्कृतीचा अपमान आहे. असे लोक मुंबईत राहण्याच्या लायकीचे नाहीत.'
अनेकांनी तिला सुचवलं की, 'त्रास होत असेल तर इअरफोन्स वापर किंवा विसर्जनाच्या काळात शहराबाहेर जा.' तर काहींनी थेट 'इथून चालती हो' अशा शब्दांत तिला झापलं.
संस्कृती विरुद्ध वैयक्तिक अस्वस्थता
या प्रकरणामुळे एक प्रश्नही पुढे आला सण-उत्सवात मोठ्या आवाजाचा वापर कितपत योग्य? कायदेशीर दृष्ट्या विसर्जनाच्या वेळी ढोल-ताशांना परवानगी आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र, काहींना यामुळे होणारा त्रास नाकारता येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा: Ganesh Visarjan 2025: मुंबई ट्रॅफिक अलर्ट! गणेश विसर्जनावेळी वाहतुककोंडी टाळण्यासाठी वापरा हे मार्ग; रस्त्यांची यादी जाहीर
कशिशसाठी नवे संकट?
तिचा हा व्हिडिओ जरी वैयक्तिक मत म्हणून मांडला गेला असला, तरी तो उलटाच ठरला आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चाहत्यांपैकी काहींनी तिच्या अकाउंटवरून अनफॉलो करण्यास सुरुवात केली असल्याचं दिसतं.