Mithun Chakraborty: कुणाल घोष अडचणीत; मिथुन चक्रवर्तींनी दाखल केला 100 कोटींचा मानहानी खटला
Defamation Case Against Kunal Ghosh: तृणमूल काँग्रेस (TMC) चे प्रवक्ते कुणाल घोष यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्याविरुद्ध कोलकाता उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानी खटला दाखल केला आहे. मिथुन यांनी आरोप केला की घोष यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध खोटे व द्वेषपूर्ण आरोप करून प्रतिष्ठा मलिन केली आहे.
मिथुन यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप
मिथुन यांच्या वकिलाच्या मते, कुणाल घोष यांनी जुलै महिन्यातील पत्रकार परिषदेत मिथुन यांचे चिट फंड घोटाळ्यांमध्ये संबंध असल्याचे म्हटले होते. तसेच, चौकशी टाळण्यासाठी मिथुन यांनी TMC सोडून BJP मध्ये प्रवेश केल्याचा आरोप केला होता. त्याहून गंभीर म्हणजे, मिथुन यांच्या मुलावर लैंगिक अत्याचार प्रकरणी आणि पत्नीवर आर्थिक घोटाळ्यात सहभागी असल्याचे वक्तव्य केले गेले, जे मिथुन यांनी पूर्णपणे निराधार म्हटले आहे. या वादामुळे बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा TMC-BJP संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.
कुणाल घोषांचा पलटवार
मिथुन यांनी यापूर्वी कुणाल घोष यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र, समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने खटला दाखल केला. यावर प्रतिक्रिया देताना कुणाल घोष म्हणाले की, मला अजून कोणतीही नोटीस मिळालेली नाही, पण जर 100 कोटींचा खटला दाखल झाला असेल तर मीही मिथुनविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करणार. त्यांनी हेही सांगितले की, मिथुन यांनी अनेकदा पक्षांतर केले आहे आणि चिट फंड प्रकरणी त्यांची भूमिका तपासलीच पाहिजे.
कुणाल घोष कोण आहेत?
कुणाल घोष यांनी शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी तब्बल 34 महिने तुरुंगात घालवले आहेत. ते TMC चे आक्रमक प्रवक्ते मानले जातात आणि अनेकदा BJP नेत्यांवर हल्लाबोल करतात. तर मिथुन चक्रवर्ती यांनी 2021 मध्ये TMC सोडून BJP मध्ये प्रवेश केला आणि बंगालमध्ये पक्षाचे स्टार प्रचारक झाले. अलीकडेच, कोलकाता पोलिसांनी त्यांच्या एका भाषणाबद्दल एफआयआरही दाखल केला होता.