Kunal Kamra Gets Anticipatory Bail: कुणाल कामराला अटकेपासून मोठा दिलासा! मद्रास उच्च न्यायालयाने मंजूर केला अटकपूर्व जामीन
Kunal Kamra Gets Pre-Arrest Bail: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या विनोदी कलाकार कुणाल कामरा यांना मद्रास उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने विनोदी कलाकार कुणाल कामरा यांना 7 एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. शिंदे यांच्यावरील विनोदांमुळे वादग्रस्त ठरलेल्या कामरा यांनी या प्रकरणात ट्रान्झिट अॅन्टिसिपेटरी जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केल्यानंतर काही तासांतच त्याला दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - Kunal Kamra Controversy: कुणाल कामराच्या अडचणीत वाढ! विधानपरिषदेने स्विकारली विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस
न्यायाधीश सुंदर मोहन यांनी विल्लुपुरम जिल्ह्यातील वानूर येथील न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समाधानासाठी जामीन भरावा लागेल या अटीवर कामरा यांना दिलासा दिला. न्यायाधीशांनी दुसऱ्या प्रतिवादीला (खार पोलिस) नोटीस बजावली आणि प्रकरणाची सुनावणी 7 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्या जीवाला धोका असल्याने ते महाराष्ट्राच्या न्यायालयात जाऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे.
कुणाल कामराने उच्च न्यायालयात सांगितले की, तो 2021 मध्ये मुंबईहून तामिळनाडूला गेला होता आणि तेव्हापासून तो राज्यातील एक सामान्य रहिवासी आहे. त्याला मुंबई पोलिसांकडून अटक होण्याची भीती आहे. कामराचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने त्याला अटकेपासून दिलासा दिला.
मुंबई पोलिसांचे कुणाल कामराला समन्स -
मुंबईच्या खार पोलिसांनी 31 मार्च रोजी कुणाल कामराला समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. पोलिसांकडून हा दुसरा समन्स आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त विनोदामुळे कामरा यांच्यावर टीका होत असून शिंदे गट शिवसैनिकांनी कामराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.