Zubeen Garg Dies: संगीतविश्वावर कोसळली शोककळा! प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे स्कूबा डायव्हिंग अपघातात निधन
Zubeen Garg Passes Away: बॉलिवूडमधील अनेक अविस्मरणीय गाण्यांना आवाज देणारे आणि आसामी संगीत उद्योगातील महत्त्वाचे स्थान मिळवलेले प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना त्यांचा अपघात झाला. रुग्णालयात दाखल करूनही त्यांना वाचवता आले नाही. या बातमीने त्यांच्या चाहत्यांमध्ये तसेच संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.
नॉर्थ ईस्ट न्यूजच्या माहितीनुसार, गर्ग स्कूबा डायव्हिंगदरम्यान समुद्रात बुडाले. त्यांना तातडीने वाचवण्यात आले आणि ICU मध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते त्या दिवशी सिंगापूरमध्ये आयोजित नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करणार होते.
आसामचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री अशोक सिंघल यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करताना म्हटले की, 'त्यांच्या संगीतातून पिढ्यांना आनंद, सांत्वन आणि ओळख मिळाली. त्यांच्या जाण्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. आसामने आपल्या सर्वात प्रिय पुत्रांपैकी एक गमावला आहे.'
त्याचप्रमाणे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं आहे की, 'ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. राज्याने आणि देशाने एक मोठा सांस्कृतिक प्रतीक गमावले आहे. झुबिन गर्ग राज्यासाठी काय होते हे शब्दांत सांगणे कठीण आहे.'
कोण होते झुबिन गर्ग?
1972 मध्ये मेघालयात जन्मलेले झुबिन गर्ग यांचे खरे नाव झुबिन बोरठाकूर होते. 'या अली' (चित्रपट : गँगस्टर, 2006) या सुपरहिट गाण्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी 'सुबह सुबह', 'क्या राज है' यांसह अनेक बॉलिवूड हिट गाणी दिली. त्यांनी आसामी, बंगाली, हिंदीसह 40 हून अधिक भाषा आणि बोलींमध्ये गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्व एक बहुआयामी कलाकार गमावला आहे.