शिल्पा शेट्टी आणि तिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा

Cash Scam Row: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर 60 कोटींच्या फसवणुकीचा आरोप, गुन्हा दाखल

Cash Scam Row: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत आले आहेत. यावेळी त्यांच्यावर एका व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. तक्रारीनुसार, मुंबईतील उद्योगपती दीपक कोठारी यांनी 2015 ते 2023 दरम्यान शिल्पा-राज यांच्या कंपनी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड मध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी एकूण 60.48 कोटी रुपये गुंतवले  होते. मात्र, ही रक्कम व्यवसायात न गुंतवता वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याचा दावा करण्यात आला आहे.

दीपक कोठारी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, ते 2015 मध्ये एजंट राजेश आर्य यांच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या संपर्कात आले. त्यावेळी शिल्पा या कंपनीच्या संचालक होत्या आणि 87 टक्के हून अधिक शेअर्स त्यांच्या नावावर होते. सुरुवातीला कंपनीसाठी 12 टक्के वार्षिक व्याजदराने 75 कोटी रुपयांचे कर्ज देण्याची ऑफर देण्यात आली होती, परंतु नंतर कोठारी यांनी ही रक्कम गुंतवणूक म्हणून देण्याचे ठरवले.

हेही वाचा - John Abraham : 'छावा' सारख्या चित्रपटात कधीच काम करणार नाही'; जॉन अब्राहमचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला, 'मला अशा चित्रपटांची...'

करारानुसार, कोठारी यांनी एप्रिल 2015 मध्ये पहिल्या हप्त्यात 31.95 कोटी रुपये हस्तांतरित केले. त्यानंतर जानेवारी 2025 ते मार्च 2016 दरम्यान आणखी 28.54 कोटी रुपये दिले. याशिवाय, 3.19 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून भरले. कोठारी यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2016 मध्ये शिल्पा शेट्टी यांनी वैयक्तिक हमीपत्र दिले होते. परंतु सप्टेंबर 2016 मध्ये त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला.

हेही वाचा - Salman Khan: सलमान खानला आयपीएल टीमची ऑफर, म्हणाला 'मला एक टीम खरेदी करण्याची...

त्यानंतर लवकरच कंपनीविरुद्ध 1.28 कोटी रुपयांचा दिवाळखोरीचा खटला दाखल झाला, ज्याची माहिती कोठारी यांना मिळाली नव्हती. वारंवार मागणी करूनही गुंतवलेली रक्कम परत न मिळाल्याने अखेर त्यांनी मुंबईतील जुहू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. सध्या हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) ताब्यात असून तपास सुरू आहे. या आरोपांवर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.