'तुझ्या डोक्यात घाणच भरलीय!' – सर्वोच्च न्यायालयाचा रणवीर अलाहाबादियाला दणका
यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले आहे. आई-वडिलांबाबत अश्लील आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला चांगलाच धडा शिकवला आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बरळणे हे अयोग्यच असल्याचे स्पष्ट करत, सर्वोच्च न्यायालयाने त्याला आपला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
विवादास कारणीभूत ठरलेले वक्तव्य
काही दिवसांपूर्वी समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरातून यावर संताप व्यक्त करण्यात आला. विविध शहरांमध्ये त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्या, ज्यामुळे हा विषय अधिक गंभीर बनला.
न्यायालयाचा कठोर इशारा
यूट्यूबरने सर्व एफआयआर एकत्र करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर 18 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीदरम्यान स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर हे अश्लील नाही, तर काय आहे?” न्यायालयाने रणवीरला फटकारत म्हटले की, “तुम्ही अशा भाषेचा वापर करताना लाज वाटली पाहिजे. लोकप्रियता म्हणजे काहीही बोलण्याचा परवाना नाही.” त्याचबरोबर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “समाजात काही मूल्ये असतात. प्रत्येक वेळी स्वातंत्र्याचा हवाला देऊन तुम्ही काहीही बरळू शकत नाही. लोकप्रियता म्हणजे जबाबदारी विसरणे नव्हे.”
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा. दरम्यान रणवीरचे वकील डॉ. अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयात सांगितले की, याचिकाकर्त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. मात्र, न्यायालयाने याकडे दुर्लक्ष करत सांगितले की, “अशा वर्तनाचा निषेध केला पाहिजे, बचाव नाही.”
रणवीरच्या वक्तव्यावर सोशल मीडियावरही प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले जाणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.