कंपनीने आपल्या 6.13 लाख जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुम

TCS मध्ये 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ; कर्मचारी कपातीवर CEO ने दिलं स्पष्टीकरण

TCS layoffs

TCS Layoffs: भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने 2026 या आर्थिक वर्षासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या 6.13 लाख जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2 टक्के म्हणजेच सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) यासाठी कारणीभूत आहे का?

एआयचा अप्रत्यक्ष प्रभाव?

कंपनीचे सीईओ के. कृतिवासन यांनी याबाबत थेट एआयला जबाबदार धरलेले नसले, तरी त्यांच्या विधानांमधून स्पष्ट होते की नवीन वर्क मॉडेल्स, एआय-चालित कामकाज यामुळे कामाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. ज्यांच्या कौशल्यांचा उपयोग भविष्यातील कामासाठी होणार नाही, अशा कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे कृतिवासन यांनी सांगितले. विशेषतः वॉटरफॉल मॉडेल किंवा जुन्या तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवे तंत्र आत्मसात करणे कठीण जात आहे, असंही त्यांनी नमूद केलं. 

हेही वाचा - दिलासादायक बातमी! UPI पेमेंटवर आता कोणताही GST नाही

दरम्यान, टीसीएसने आपल्यातील अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांना एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षित केले होते. मात्र तरीही काही कर्मचारी नवीन प्रणालींशी जुळवून घेण्यात अपयशी ठरले. कृतिवासन यांनी या कर्माचारी कपातीला माझ्या कार्यकाळातील सर्वात कठीण निर्णय म्हटले आहे. 

हेही वाचा - IT कंपनी Intel चा मोठा निर्णय! 25 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

उद्योगातील बदलता ट्रेंड

गुगल, मायक्रोसॉफ्ट, सेल्सफोर्स यासारख्या कंपन्यांमध्ये आज 50 टक्के कोड एआयद्वारे ऑटोमेटेड पद्धतीने लिहिला जातो. तसेच अ‍ॅप्स व वेबसाइट्स काही मिनिटांत तयार होतात. परिणामी, मोठ्या टीम्स आणि मॅन्युअल कामाची गरज घटत चालली आहे. त्यामुळे टीसीएससारख्या कंपन्या आता अधिक लवचिक, कुशल आणि संक्षिप्त टीम संरचना तयार करत आहेत. तथापी, भविष्यकाळात आयटी क्षेत्रात टिकून राहण्यासाठी सतत कौशल्य उन्नती आणि तंत्रज्ञानाशी सुसंगत राहणे अत्यावश्यक ठरणार आहे.