Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी गयामध्ये पितृपक्षात पिंडदान करून पूर्वजांना दिली श्रद्धांजली
बिहार: पितृपक्षाच्या निमित्ताने उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गयामध्ये पिंडदान केले. शुक्रवारी ते खासगी विमानाने गयात पोहोचले होते. या वेळी त्यांच्यासोबत धाकटा मुलगा अनंत अंबानीही उपस्थित होता. विष्णुपद मंदिरातील हरिमंडपात विधीवत पूजा करून त्यांनी पिंडदानाचा संस्कार पार पाडला.
या धार्मिक विधीनंतर मंदिरातील पुरोहितांनी सांगितले की, हा अंबानी यांचा गयातील पहिलाच आध्यात्मिक दौरा होता. पिंडदानानंतर विष्णुपद प्रबंधकारिणी समितीने त्यांचा सन्मानही केला. अंबानी यांनी देखील जिल्हा प्रशासनाने केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक केले. संपूर्ण मंदिर परिसरात त्यांच्या आगमनापूर्वी काटेकोर सुरक्षा तपासणी करण्यात आली होती.
हेही वाचा: IAF MiG-21 : सहा दशकांचा प्रवास संपणार; मिग-21 ला देणार अखेरचा सलाम
मुकेश अंबानी आणि त्यांच्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी शशांक शुभंकर व एसएसपी आनंद कुमार स्वतः उपस्थित होते. मंदिर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या भेटीत प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाने सर्व व्यवस्था नीट पार पाडल्याचे दिसून आले.
दरम्यान, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील बिहारच्या दौर्यावर असून त्या गयात पिंडदान करणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमासाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस विभागाने विशेष तयारी केली असून वाहतूक व्यवस्थाही नियंत्रित ठेवली जाणार आहे.
हिंदू परंपरेनुसार गयामध्ये पिंडदान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. येथे भगवान विष्णूंचे पवित्र पदचिन्ह असल्याने येथे केलेले पिंडदान पूर्वजांना मोक्ष मिळवून देते, असा विश्वास आहे. त्यामुळे दरवर्षी पितृपक्षाच्या काळात हजारो लोक गयाला जाऊन हा धार्मिक विधी पार पाडतात.