Virar Crime : शिवीगाळ अन् अश्लील हावभाव; विरार-दादर लोकल रेल्वेमध्ये एका नराधमाचा प्रताप समोर
मुंबई: मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. मात्र, लोकलमध्ये होणारी गर्दी आणि उशीराने धावणाऱ्या लोकल रेल्वेमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच, विरार-दादर लोकल रेल्वेमध्ये एका नराधमाने धुमाकूळ घातला होता. हा नराधम महिलांच्या डब्याच्या दरवाज्याला लटकलेला दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा नराधम शिवीगाळ आणि अश्लील हावभाव करताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे, दैनंदिन लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
11 सप्टेंबर रोजी सांयकाळी 6 वाजल्याच्या सुमारास पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार - दादर लोकल रेल्वेच्या महिला डब्यात एका नराधमाने धुमाकूळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा नराधम दहिसर येथे चढला होता. यानंतर, त्या नराधमाने अंधेरीपर्यंत लोकल रेल्वेमध्ये बसलेल्या महिलांना त्रास दिला. या घटनेमुळे, महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते.
विरार - दादर लोकल रेल्वेने प्रवास करताना यानराधमाने महिला डब्यात बसलेल्या महिलांना अश्लील शिवीगाळ आणि हावभाव करून त्रास देत होता. इतकंच नाही, तर हा नराधम लोकल रेल्वेच्या लगेज डब्यात आला आणि महिला डब्याच्या खिडकीवर आणि पत्र्यावर अक्षरक्ष: लाथा बुक्क्याने मारून धुमाकूळ घातला होता. यादरम्यान, महिला प्रवाशांनी मदतीसाठी रेल्वे हेल्पलाईनवर फोनही केले, मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. या घटनेमुळे, दैनंदिन लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेबाबत एका पीडित महिलेने माहिती दिली. 'आर्धा तास झाले महिला 129, 1521 या रेल्वे हेल्पलाईन नंबरवर फोन करत होत्या. मात्र, आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही'.