मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी चित्रपट प

Dashavtar Movie Review : मराठी चित्रपटसृष्टीत 'दशावतार' सिनेमा ठरणार गेमचेंजर? जाणून घ्या चित्रपटाचा रिव्ह्यू

मुंबई: मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या जारण, गुलकंद, अशा अनेक मराठी चित्रपटांनी रसिक प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणले. अशातच, काही दिवसांपूर्वी 'दशावतार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. कोकणच्या मातीत घडणारे दशावतारी नाटक परंपरा आणि संस्कृतीचे मानले जाते. म्हणूनच, जेव्हा 'दशावतारी' चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. अशातच, 'दशावतार' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. जर तुम्ही सुद्धा 'दशावतार' चित्रपट पाहायला जाणार असाल, तर जाणून घ्या 'दशावतार' चित्रपटाचा रिव्ह्यू.

'दशावतार' चित्रपटाची कथा कोकणातील एका गावातून सुरू होते आणि दशावतारी नाटकात काम करणारे ज्येष्ठ कलाकार बाबुली (दिलीप प्रभावळकर) यांच्या अवतीभवती फिरते. गावात बाबुलीचा खूप आदर केला जातो. दशावतारी नाटकांत त्यांनी रंगवलेल्या अनेक पात्रांना पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होतात. बाबुलीला गाव अत्यंत प्रिय आहे. सोबतच, गावातील जंगल आणि राखणदारावर बाबुलीची खूप श्रद्धा असते. या चित्रपटात बाबुलीचा एकुलता एक मुलगा आहे, ज्याचं नाव आहे माधव. या चित्रपटात सिद्धार्थ मेनन माघवची भूमिका साकारत आहे. 

आपल्या वडिलांचं वय झाल्याने त्यांनी दशावतारात काम न करता आराम करावं, अशी माधवची इच्छा असते. मात्र, बाबुलीची एक अट असते आणि ते म्हणजे,  'जेव्हा आपल्या मुलाला नोकरी मिळेल, तेव्हापासून आपण दशावतारात काम करणार नाही'. काही कालावधीनंतर, माधवला नोकरी मिळते आणि त्यामुळे, महाशिवरात्रीच्या शेवटच्या दिवशी बाबुली दशावतार करण्याचं निश्चय करतो. तेव्हा, अचानक गावात एक मोठी घटना घडते. या घटनेमुळे, बाबुली प्रचंड भयभीत होतो. या घटनेनंतर, चित्रपटात अनेक नवनव्या घडामोडी घडायला सुरूवात होते. या चित्रपटात पुढे काय होतं? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला 'दशावतार' चित्रपट पाहावा लागेल. 

चित्रपटात, दिलीप प्रभावळकर यांनी बाबुलीची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. विशेष म्हणजे, दिलीप प्रभावळकर यांनी बाबुलीच्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यासह, सुबोध खानेलकरांनी 'दशावतार' चित्रपटाची कथा खूप सुंदरपणे मांडली आहे. सोबतच, सुबोध खानेलकरांनी उत्कृष्ट दिग्दर्शन केलं आहे. तसेच, महेश मांजरेकरांच्या एंट्रीने चित्रपटाला नवीन वळण मिळालं. दिलीप प्रभावळकर यांच्यासह, महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, अभिनय बेर्डे आणि अमेय वाघ यांसारख्या कलाकारंनी 'दशावतार' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.