ग्रीसच्या राजदूतांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचं कौतुक
India Pride: युनेस्कोमधील ग्रीसचे राजदूत महामहिम श्री. जॉर्जिओस कौमुत्साकोस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. त्यांनी म्हटलं की, राजमुद्रेत लिहिलेले शब्द 'अतिशय ज्ञानी आणि दूरदृष्टीपूर्ण' आहेत. महाराजांच्या राजमुद्रेत असलेले विचार आणि त्यातील आशय आजही प्रेरणादायी ठरत आहेत.
राजदूतांनी असेही नमूद केले की, 'शहाजींचे पुत्र शिवाजी यांच्या या मुद्रेचा महिमा चंद्राच्या पहिल्या दिवसासारखा वाढेल. जग त्याचा सन्मान करेल आणि ती केवळ लोककल्याणासाठी चमकेल.' ही भावना शिवरायांच्या कार्यपद्धतीचे प्रतीक आहे. ग्रीससारख्या राष्ट्राच्या प्रतिनिधीकडून असा गौरव मिळणं हे महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचे जगभरातील महत्त्व अधोरेखित झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा: छत्रपती शिवाजी महाराज 1636 साली वडील शहाजी राजांसोबत बेंगळुरू येथे वास्तव्यास होते. वयाच्या बाराव्या वर्षी, म्हणजे 1642 मध्ये, शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीची जबाबदारी दिली. त्यावेळी शिवाजी महाराजांना स्वतंत्र राजमुद्रा, ध्वज, योग्य सल्लागार व शिक्षणासाठी शिक्षक यांची साथ देत पुण्याकडे पाठवण्यात आले. या घटनेचा उल्लेख 'शिवभारत' या संस्कृत ग्रंथात करण्यात आला आहे. शहाजी राजे व जिजामाता यांनी वापरलेली राजमुद्रा ही फारसी किंवा यावनी भाषेच्या प्रभावाखाली होती, तर शिवाजी महाराजांची राजमुद्रा शुद्ध संस्कृत भाषेत होती. यामागचा हेतू आपल्या भाषेचे जतन आणि संवर्धन हाच होता. इतिहासकारांच्या मते, 1646 साली लिहिलेल्या एका पत्रावर प्रथमच ही राजमुद्रा उमटलेली आहे. 1646 ते 1680 या काळात शिवाजी महाराजांनी वापरलेली मुद्रेची छाप असलेली सुमारे 250 पत्रे आजही संशोधकांच्या संग्रहात उपलब्ध आहेत.
राजमुद्रेवरील मजकूर: प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता॥ साहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥
अन्वय: प्रतिपत् चंद्र लेख इव वर्धिष्णुः विश्ववंदिता॥ साहसूनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते॥
मराठी अर्थ: प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिवस वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे. प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व अवघ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.