3500 कोटींच्या दारू घोटाळ्यात जगन मोहन रेड्डींचं नाव; SIT च्या आरोपपत्रात लाचखोरीचा दावा
आंध्र प्रदेश: वायएसआर काँग्रेस पक्षाच्या (YSRCP) शासनकाळात उघडकीस आलेल्या 3500 कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचे नाव आता चर्चेत आले आहे. एसआयटीने सादर केलेल्या 305 पानांच्या आरोपपत्रात रेड्डी यांचे नाव लाच घेणाऱ्यांपैकी एक म्हणून नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप अधिकृतपणे आरोपी ठरवण्यात आलेले नाही.
दरम्यान, 2019 ते 2024 दरम्यान डिस्टिलरी कंपन्यांकडून दरमहा 50 ते 60 कोटी रुपये गोळा करून ते शेल कंपन्या आणि सहकारी नेटवर्कमार्फत पाठवले जात होते. या पैशांचा उपयोग दुबई आणि आफ्रिकेत सोनं, जमीन आणि आलिशान मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करण्यात आला होता, असा आरोप आहे. एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये देण्यात आलेली लाच रोख, सोन्याच्या किंवा सोन्याच्या वस्तूंच्या स्वरूपात होती. दारू वितरण व्यवस्थेवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या धोरणातून ही भ्रष्ट यंत्रणा सुरू झाली होती.
हेही वाचा - केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ मार्क्सवादी नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचे निधन
राज कासीरेड्डी मुख्य सूत्रधार -
या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सल्लागार राज कासीरेड्डी उर्फ राजशेखर रेड्डी हे मुख्य आरोपी असून त्यांच्यावर ओएफएस प्रणाली बदलणे, विश्वासू अधिकारी नेमणे आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. त्यांनी 30 पेक्षा अधिक शेल कंपन्यांमार्फत पैशांची उलाढाल केल्याचा ठपका आहे.
राजशेखर रेड्डी आणि माजी आमदार चेविरेड्डी भास्कर रेड्डी यांनी YSRCP च्या निवडणुकीसाठी 250 ते 300 कोटी रुपये रोख स्वरूपात वापरल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तथापी, YSRCP खासदार पीव्ही मिधुन रेड्डी यांना शनिवारी अटक करण्यात आली. सात तासांच्या चौकशीनंतर एसआयटीने त्यांना अटक केली. मिधुन रेड्डी यांनी घोटाळ्यात निर्णायक भूमिका बजावल्याचं सांगण्यात येत आहे.
याप्रकरणात एसआयटीने 268 साक्षीदारांची चौकशी केली असून 62 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणातील दुसरे आरोपपत्र 20 दिवसांत दाखल होणार असल्याचे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.