Raj Thackeray On Dashavatar Movie : राज ठाकरेंनी केलं दशावतार चित्रपटाचं कौतुक; म्हणाले, 'जमिनी वाचवा, कारण तुमचं अस्तित्व...'
मुंबई: मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशातच, काही दिवसांपूर्वी 'दशावतार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. कोकणच्या मातीत घडणारे दशावतारी नाटक परंपरा आणि संस्कृतीचे मानले जाते. त्यामुळे, जेव्हा जेव्हा 'दशावतार' चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली.
अशातच, 'दशावतार' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. 'दशावतार' चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोमवारी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'दशावतार' चित्रपट पाहिला. या चित्रपटाबाबत राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'या चित्रपटाने गंभीर प्रश्नाला हात घातलंय. मी गेले अनेक वर्ष माझ्या भाषणांमधून महाराष्ट्राला सांगत आलो की, आपल्याकडच्या जमिनी वाचवा, कारण जमीन हे तुमचं अस्तित्व आहे'.
'दशावतार' चित्रपटाबाबत राज ठाकरेंची प्रतिक्रिया
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, 'या चित्रपटाने गंभीर प्रश्नाला हात घातलंय. मी गेले अनेक वर्ष माझ्या भाषणांमधून महाराष्ट्राला सांगत आलो की, आपल्याकडच्या जमिनी वाचवा, कारण जमीन हे तुमचं अस्तित्व आहे. खरंतर, हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे, ही गोष्ट एकट्या कोकणाची नाही. महाराष्ट्रातील अनेक जमिनींचा हा विषय आहे. दिग्दर्शक सुबोध खानेलकरांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने हा विषय 'दशावतार' चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे. दिग्दर्शक सुबोधने जरी असला, तरी महाराष्ट्राने बोध घ्यावा, असा हा चित्रपट आहे'.
'दशावतार' चित्रपटाची स्टारकास्ट
'दशावतार' चित्रपटात, दिलीप प्रभावळकर यांनी बाबुलीची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. विशेष म्हणजे, दिलीप प्रभावळकर यांनी बाबुलीच्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यासह, सुबोध खानेलकरांनी 'दशावतार' चित्रपटाची कथा खूप सुंदरपणे मांडली आहे. सोबतच, सुबोध खानेलकरांनी उत्कृष्ट दिग्दर्शन केलं आहे. तसेच, महेश मांजरेकरांच्या एंट्रीने चित्रपटाला नवीन वळण मिळालं. दिलीप प्रभावळकर यांच्यासह, महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, अभिनय बेर्डे आणि अमेय वाघ यांसारख्या कलाकारंनी 'दशावतार' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.