Sanjay Raut : 'बाळासाहेबांसोबत एकनाथ शिंदेंचा फोटो तर अजिबातच नको...'; त्या बॅनरवरून संजय राऊतांची खरमरीत टीका
मुंबई: नुकताच, 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने शिवसेनेच्यावतीने जाहिरात देण्यात आली होती. मात्र, जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आनंद दिघे यांचा फोटो लावल्याने, ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात टीका केली. 'आनंद दिघे नेते किंवा उपनेते नव्हते, ते फक्त जिल्हाप्रमुख होते. बाळासाहेबांसोबत तुम्ही त्यांचा फोटो का लावता', ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी असा सवाल केला. सोबतच, शिंदेंवर गंभीर आरोप करत राऊत म्हणाले की, 'बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा कट आहे'. संजय राऊतांना प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'खोट्या प्रवृत्तीच्या लोकांना दिघेसाहेब काय होते हे कळणार नाही'. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊतांनी भाष्य केले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
शुक्रवारी, खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान, संजय राऊत म्हणाले की, 'शिवसेनाचं एक प्रोटोकॉल आहे. शिवसेनाप्रमुखांशी आमची बरोबरी बरोबरी नाही. आमचाही फोटो नसेल. अशावेळी, उद्धव ठाकरेदेखील फोटो लावू देणार नाही. हा प्रोटोकॉल जो आहे'. पुढे राऊत म्हणाले की, 'एकनाथ शिंदेंनी दिघे साहेबांच्या मेमोरियलमध्ये जावं. तसेच, दिघे साहेबांच्या समाधीसमोर एकनाथ शिंदेंनी शांतपणे आत्मचिंतन करावं. त्यातून जर दिघे साहेबांनी त्यांना साक्षात्कार झाला तर त्यांना कळेल आपण किती मोठी चूक केली आहे'.
राऊत म्हणाले की, 'बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे सर्वोच्च नेते तेव्हाही होते आणि आजही आहेत. त्यांच्या आसपास कोणी नाही, ना नरेंद्र मोदी ना अमित शहा. एकनाथ शिंदे तर अजिबात नाही, कुठेच नाही'.