T20 International Match: षटकारांशिवाय 'या' खेळाडूने टी-20 मध्ये केल्या सर्वाधिक धावा
T20 International Match: झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेची सुरुवात 3 सप्टेंबर रोजी हरारे मैदानावर झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने 4 विकेट्सने विजय मिळवला. मात्र, या सामन्यात झिम्बाब्वेचा सलामीवीर ब्रायन बेनेटने आपल्या शानदार खेळीने क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम केला.
झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. या धावसंख्येत ब्रायन बेनेटचे योगदान सर्वाधिक ठरले. त्याने 57 चेंडूत 12 चौकारांच्या सहाय्याने 81 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे या खेळीत त्याच्या बॅटमधून एकही षटकार आला नाही. यामुळे तो पूर्ण सदस्य संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात षटकार न मारता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस यांच्या नावावर होता. दोघांनीही स्वतंत्रपणे 79 धावा केल्या होत्या. आता ब्रायनने त्यांना मागे टाकत विक्रम मोडला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये षटकार न मारता सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
ब्रायन बेनेट (झिम्बाब्वे) – 81 विरुद्ध श्रीलंका फाफ डू प्लेसिस (द. आफ्रिका) – 79 विरुद्ध बांगलादेश बाबर आझम (पाकिस्तान) – 79 विरुद्ध न्यूझीलंड मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) – 78 विरुद्ध वेस्ट इंडिज रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) – 76 विरुद्ध भारत
हेही वाचा - Ravi Bishnoi: 'शेवटचा सामना खेळू द्यायला हवा होता' रवी बिष्णोईचे BCCI वर थेट वार
21 वर्षीय ब्रायन बेनेट झिम्बाब्वेच्या संघातील सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत 40 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 21.17 च्या सरासरीने 978 धावा केल्या असून त्यात 6 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, कसोटीत त्याच्या नावावर 503 धावा आणि एकदिवसीय सामन्यांत 348 धावा आहेत. पहिल्या सामन्यातील पराभवानंतरही ब्रायन बेनेटच्या ऐतिहासिक विक्रमामुळे झिम्बाब्वेच्या क्रिकेटप्रेमींना अभिमान वाटत आहे. मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये त्याच्या खेळीवर सर्वांचे लक्ष केंद्रीत होणार आहे.