विलेपार्लेतील जुने जैन मंदिर पाडले; जैन समाजाचा संताप, रस्त्यावर उतरून निषेध
मुंबई: विलेपार्ले पूर्व परिसरात असलेले एक जुने आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाणारे जैन मंदिर आज सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई अंतर्गत पाडले. या कारवाईनंतर जैन समाजात तीव्र नाराजी पसरली असून, स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरत प्रशासनाच्या या कृतीचा जोरदार निषेध केला आहे.
हे मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून विलेपार्ले परिसरात कार्यरत होते. स्थानिकांच्या मते, या मंदिरात दररोज अनेक जैन भाविक दर्शनासाठी येत असत आणि अनेक धार्मिक विधी या ठिकाणी पार पडत असत. मंदिर परिसरात सण, उपवास आणि प्रवचनांच्या कार्यक्रमांनाही मोठी उपस्थिती असायची.
पालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सदर मंदिर सार्वजनिक रस्त्याच्या सीमारेषेत अतिक्रमण करून बांधण्यात आले होते. यासंदर्भात यापूर्वी अनेक वेळा नोटिसा देण्यात आल्या होत्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई किंवा स्थलांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. त्यामुळे नियमांचे पालन करत मंदिरावर कारवाई करण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
हेही वाचा :अमरावतीचा अभिमान..न्यायमूर्ती भूषण गवई ठरणार भारताचे 52वे सरन्यायाधीश, 14 मे रोजी शपथविधी मात्र, जैन समाजाच्या नेत्यांनी या कारवाईला धार्मिक भावना दुखावणारी, एकतर्फी आणि मनमानी असे म्हटले आहे . त्यांच्या मते, ही जागा कोणत्याही नव्या अतिक्रमणाचा भाग नव्हती तर जुनी, अनेक पिढ्यांची आस्था जोडलेली वास्तू होती. हे मंदिर आमच्या श्रद्धेचा भाग आहे. इतक्या सहजपणे कोणत्याही समाजाच्या धार्मिक स्थळावर कारवाई करणं दुर्दैवी आहे, असे वक्तव्य काही स्थानिक समाजसेवकांनी दिले.
सकाळी कारवाई सुरु होताच परिसरात मोठी गर्दी जमली. स्थानिक नागरिकांनी मंदिर वाचवा, 'धार्मिक स्थळांचा अपमान नको' अशा घोषणांसह रस्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली. काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र सायंकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
जैन समाजाच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेण्याची मागणी केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यासोबतच, मंदिर पुन्हा उभारण्याची परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी समोर आली आहे.
दरम्यान, स्थानिक राजकीय नेत्यांनी देखील या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत पालिकेच्या भूमिकेवर टीका केली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृतींपासून प्रशासनाने दूर राहावे, अशी आग्रही भूमिका काही नेत्यांनी घेतली आहे.