Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडूमध्ये भाजपची अण्णाद्रमुक सोबत युतीची घोषणा!
Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि अण्णाद्रमुक यांच्यात युती झाली आहे. चेन्नईच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात घोषणा केली. चेन्नईमध्ये, एआयएडीएमके नेते ई.के. पलानीस्वामी यांच्यासोबत पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, 'आज अण्णाद्रमुक आणि भाजपच्या नेत्यांनी संयुक्तपणे निर्णय घेतला आहे की आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुका अण्णाद्रमुक, भाजप आणि सर्व सहयोगी पक्ष एनडीए म्हणून एकत्रितपणे लढवतील.'
अमित शहा यांची विरोधकांवर टीका -
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अमित शहा म्हणाले की, हे (विरोधी) लोक लक्ष विचलित करण्यासाठी नीट आणि सीमांकनाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. अण्णाद्रमुकच्या कोणत्याही अटी आणि मागण्या नाहीत. आम्ही अण्णाद्रमुकच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. ही युती एनडीए आणि अण्णाद्रमुक दोघांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. तमिळनाडूचे लोक भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था, दलित आणि महिलांवरील अत्याचारांविरुद्ध मतदान करतील.
अमित शहांनी सांगितला युतीचा फॉर्म्युला -
भाजप आणि अण्णाद्रमुकच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अमित शाह आणि पलानीस्वामी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अमित शाह म्हणाले की, आज अण्णा द्रमुक आणि भाजपने निर्णय घेतला आहे की आगामी निवडणुका अण्णा द्रमुक, भाजप आणि एनडीए अंतर्गत इतर पक्ष एकत्रितपणे लढवतील. ही निवडणूक राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात पलानीस्वामींच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल.
हेही वाचा - Tahawwur Rana : लँडिंगनंतर तहव्वूर राणाचा पहिला फोटो आला समोर; आता फासावर लटकणार की तुरुंगात सडणार?
अमित शहा म्हणाले की, मला विश्वास आहे की येत्या निवडणुकीत एनडीए सरकार स्थापन होईल. आम्ही अण्णा द्रमुकच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. अण्णा द्रमुकचे नेतृत्व आणि भाजपचे प्रादेशिक नेतृत्व उर्वरित पक्षांबद्दल निर्णय घेईल. सरकार स्थापनेनंतर जागांची संख्या आणि मंत्र्यांचे वाटप दोन्ही पक्ष चर्चेनंतर ठरवतील.