1.4 अब्ज भारतीयांना तुमचा अभिमान आहे! सुनीता विल्यम्स यांना पंतप्रधान मोदींनी लिहिले खास पत्र
PM Modi Writes to NASA Astronaut Sunita Williams: नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतत आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांच्या परतीच्या प्रवासाकडे लागले आहे. हे अंतराळवीर नऊ महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकले होते. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्सम्यसाठी खास पत्र लिहिलं आहे. त्यांनी पत्रात सुनीता विल्यम्सना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी केले सुनीता विल्यम्स यांचे अभिनंदन -
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की, 'भारतीय जनतेच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज एका कार्यक्रमात मी प्रसिद्ध अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांना भेटलो. आमच्या संभाषणादरम्यान तुमचे नाव आले आणि आम्ही तुमच्या आणि तुमच्या कार्याचा आम्हाला किती अभिमान आहे यावर चर्चा केली. या संभाषणानंतर, मी तुम्हाला पत्र लिहिण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. माझ्या अमेरिकेच्या भेटीदरम्यान जेव्हा जेव्हा मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना भेटलो तेव्हा मी तुमची विचारपूस केली. 1.4 अब्ज भारतीयांना तुमच्या कामगिरीचा नेहमीच अभिमान आहे. अलिकडच्या घडामोडींनी पुन्हा एकदा तुमची प्रेरणादायी दृढता दर्शविली आहे.'
हेही वाचा - Sunita Williams: सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार
आम्ही तुम्हाला भारतात भेटण्यास उत्सुक आहोत -
पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटलं आहे की, 'तुम्ही हजारो मैल दूर असला तरी, तुम्ही आमच्या हृदयाच्या जवळ आहात. भारतातील लोक तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि तुमच्या मोहिमेत यश मिळावे म्हणून प्रार्थना करत आहेत. बोनी पंड्या तुमच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत असेल आणि मला खात्री आहे की दिवंगत दीपकभाईंचे आशीर्वादही तुमच्यासोबत असतील.'
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटलं आहे की, 2016 मध्ये माझ्या अमेरिका भेटीदरम्यान मला त्यांना तुमच्यासोबत भेटण्याची आठवण येते. तुमच्या परतल्यानंतर, आम्ही तुम्हाला भारतात भेटण्यास उत्सुक आहोत. भारताला त्यांच्या सर्वात प्रतिष्ठित मुलींपैकी एकाचे आतिथ्य करणे आनंददायी असेल. मी मायकल विल्यम्सना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. तुम्हाला आणि बुच विल्मोरला सुरक्षित परतीसाठी शुभेच्छा.